11 October, 2016
पुस्तकातला ऑटम “आऽऽऽच्छी....!” माझा मित्र फोनवर बोलता बोलता शिंकला, आणि ‘तिकडल्या’ हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे सांगितले. परदेशवारी प्रत्यक्ष करण्याचा योग आला नसला तरीही चित्रपट, वर्तमानपत्र, कथा-कादंबर्या आणि हल्लीच्या फेसबुक-व्हॉट्सॲप आंदोलनामुळे पाश्चात्त्य देशांचे एक विशिष्ट चित्र मनावर आपोआप रेखाटले गेले आहे. स्वच्छ, सुंदर, सुबक, मोहक, देखणे, मनोरम अशी अनेक विशेषणे लावता येतील असे एकाहून एक सरस देश. शाळेत असताना पाश्चात्त्य लेखक आणि कवींनी बालमनात जे चित्र भरले ते फोटोंच्या माध्यमातून खरेच वाटू लागले. “विस्तीर्ण बाग, बागेतले मऊसर हिरवेगार लॉन, सर्वदूर पसरलेली रंगीबेरंगी पानगळ, पार्कबेंचवर रेलून बसलेला, मानेपर्यंत रुळलेल्या केसांशी उगीच चाळा करणारा रांगडा तरूण, पलीकडच्या कोपर्यात असलेल्या बेंचवर वॉकिंग स्टिकच्या मुठीवर स्वतःची मूठ आणि हनुवटी टेकवून शून्यात बघणारा साठीतला एकटा, दगडी पायवाटेवर विखुरलेली कोरडी पाने आपल्या गुडघ्यापर्यंतच्या गमबुटांनी निर्दयतेने चुरगाळून पुढेच पुढे जाणारी देखणी, आणि त्या पानांच्या करकरण्याने कान टवकारून लडिवाळपणे भू करणारा रुबाबदार जर्मन शेपर्ड, असे सगळे बघण्यात काय मजा येत असेल रे” ह्या माझ्या भाबड्या बोलण्यावर तो म्हणाला, “अरे कोणता पार्क आणि कसले गवत?” त्याच्या मते पार्कबेंचवर बसू देण्याइतकी तिकडली थंडी काही रमणीय वगैरे नसते. शेक्सपिअर ते टॉलस्टॉय आणि वर्डस्वर्थ ते फ्रॉस्ट पर्यंत सगळ्यांना माझ्या मित्राने एका झटक्यात खोटारडे ठरवून टाकले होते. नवल म्हणजे ह्याच मित्राला भारतातला ग्रीष्माअंती येणारा पहिला पाऊस मात्र केवढा आवडायचा; नव्हे, अजूनही आवडतो. आता मी त्यास माझी पावसातली त्रेधा तपशीलवार सांगीतली, तर पाडगावकर-माडगूळकर मंडळी त्याला खोटी वाटावयास लागतील.
कामाच्या व्यापात, जबाबदार्यांच्या गराड्यात बहुधा त्या थंडीचा त्रास त्याला प्रकर्षाने जाणवत असावा. दुरून डोंगर साजरे असतात. न राहवून मला शालेय जीवनात वाचलेली ‘दि लिटिल मॅच गर्ल’ आठवली. आगपेटीतल्या प्रत्येक पेटत्या काडीच्या प्रकाशात दर वेळी सुरेख स्वप्नात हरविणारी चिमुरडी शेवटची काडी विझताच जीवघेण्या थंडीत जीव टाकते. प्रेमात पडण्याच्या नाजुक वयात ती शोकांतिका वाचून सर्वांगावर आलेले शहारे आजही स्मरतात. प्रमाणाबाहेरची बर्फवृष्टी, निसरडे रस्ते, त्यामुळे होणारे अपघात, फ्लू ची भयंकर साथ, अंगभर घालाव्या लागणार्या जाड्याभरड्या कपड्यांमुळे होणारी अस्वस्थता ह्या सर्वांची झळ जावे त्यांच्या देशा तेव्हाच कळे. जी अवस्था माझी, तीच त्याची. त्याला इकडच्या ऋतूंचे अतोनात वेड. परंतु भारतातदेखील विविध ऋतूंमध्ये नाना कारणांनी त्रास हा होतोच. गेली कित्येक वर्षे तिकडे वास्तव्यास असल्यामुळे इकडल्या त्रासाची बहुधा त्यास जाणीव नसावी.
पण हा ऋतूंमधील त्रास नाण्याची एकच बाजू सांगतात. ही बाजू जेवढी जाचक वाटते, तेवढीच दुसरी बाजू रमणीय आणि आल्हाददायक असते. जीवघेण्या थंडीत कामे उरकून जेव्हा मित्र घरी परतत असेल तेव्हा फायरप्लेससमोर पाय मोकळे सोडून वाफाळलेल्या, फेसाळलेल्या गरम कॉफीचे घोट घेताना जे समाधान तो अनुभवत असेल, तसलेच काहीसे आपणही पावसात चिंब भिजून, घरी परतून, कढत पाण्याचे स्नान उरकून आल्याचा चहा पिताना अनुभवतो. कॉफीचा आस्वाद घेता-घेता खिडकीबाहेरच्या पार्कचा मघाचा शुष्क देखावा त्यालाही तेवढाच रम्य वाटत असेल, जेवढा खिडकीबाहेरचा धो-धो पाऊस आपल्याला सुखावतो. बोचणारी बाजू पाहिल्याखेरीज मखमली बाजूचे महत्त्व आणि अस्तित्व पटत नसावे. नाण्याच्या ह्या सुखद बाजूचे बरेचसे श्रेय लेखणीबहाद्दरांनाच द्यावे लागेल. आपल्या नकळत आपण बालपणी आणि ऐन तारुण्यात वाचलेले शब्द प्रत्यक्षात जगत असतो. त्या शब्दांत स्वतःला ठेवून एका रम्य विश्वात रमत जातो.
अनेकदा सांसारिक आणि व्यावहारिक गुंतागुंतीत अडकून ऋतूंमध्ये गंमत देखील असते हे मुळी आपण विसरूनच जातो. अशा वेळी पूर्वी वाचलेले साहित्य आठवून जखमांवर फुंकर घातल्यागत वाटते. ऋतू असोत अथवा जीवनातील विभिन्न अवस्था, प्रत्येक परिस्थितीत लेखक वा कवी स्वतःला तर चपखलपणे बसविण्यात तरबेज असतातच; पण वाचकाला देखील एका वेगळ्याच, काल्पनिक, पण वास्तव वाटणार्या अवस्थेत सहज घेऊन जातात. त्यांच्या ओळी कल्पनाविलास, अतिशयोक्ती देखील असतील; पण रोजच्या रहाटगाडग्यातून काही काळ बाहेर निघून, मोजके क्षण स्वप्नात हरवू देऊन, पुन्हा त्याच किंवा त्याहूनही अधिक कष्टांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मात्र नक्कीच देतात. किंबहुना त्यांचे शब्द वास्तव धरले, तर अगदी काही क्षणांपूर्वीपर्यंत नकोसे वाटणारे पावसातले डबके छपक-छपक करण्याची लालूच दाखविल्याखेरीज राहत नाही.
*****
बिनतारी अहेर
“पोस्टमन .....!” अलीकडे क्वचितच कानी येणारी हाक ऐकून अगोदर काकूंनी दुर्लक्ष केले. एरवी तो अधूनमधून येणारी पत्रे दाराखालून सरकवून निघून जात असे. पण पुन्हा एकदा हाक ऐकू आली तेव्हा काकू समोरच्या खोलीत आल्या. लोखंडी जाळीच्या भक्कम दारापलिकडे काकूंना कुणी उभे असलेले दिसले. चारपाच ठराविक प्रश्न विचारून, तो नक्की पोस्टमनच आहे ह्याची खात्री करून घेऊन काकूंनी दार उघडले. गेल्या काही वर्षात भुरटे चोर आणि माथेफिरूंचा हैदोस वाढला होता. ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरून लूटमार करणे आणि जरासाही विरोध दर्शविल्यास जीवे मारण्याच्या घटना हल्ली नियमित झाल्या होत्या. त्यामुळे लोखंडी दार उघडण्यापूर्वीचे प्रश्न ही कवायतच झाली होती. “हं .... इथे ....” एका चुरगळलेल्या कागदावर वाचताना कुणालाही भोवळ यावी अशा गिचमिड अक्षरात लिहिलेल्या यादीतील एका नावापुढे पोस्टमनने काकूंना सही करावयास लावले. सुरेख, रंगीबेरंगी नक्षी असलेल्या चमचमणार्या कागदाचे वेष्टन चढवलेले ते एक पार्सल होते. पोस्टमन अजूनही रेंगाळतोय असे पाहून काकू म्हणाल्या, “थांबा, पाणी आणते.” उन्हात फिरून दमलेला पोस्टमन पंचाने घाम पुसत दाराशेजारी असलेल्या ओसरीवर एक लांब सुस्कारा सोडून बसला. “अकस्मात आलेल्या पाहुण्यास हातावर गोड घातल्याखेरीज परतू देऊ नये हों ....... वत्सलें .......” वेंगुर्ल्याच्या आत्याने अनेकदा सांगितलेले काकूंना पुन्हा एकदा आठवले, आणि वर्हाडात अपवादानेच कानी पडणारा तिचा सानुनासिक आवाज आठवून ओठांवर स्मित ही आले. पाण्याबरोबर अनपेक्षितपणे आलेली लाडवाची वाटी पाहून पोस्टमन ओशाळला. “त्रास घेतला तुम्ही .....” पोस्टमनने वाटी आणि गडवा-पेला घेत म्हटले. कामे बरीच शिल्लक असल्याने पोस्टमनने जरा लगबगीनेच लाडू खाल्ला आणि निरोप घेता घेता काकूंना विचारले, “इनाम देता?”
साधारण वर्षभरापूर्वी काकांच्या खात्यात भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यापासून सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांचेे पेन्शन बेमुदत काळापर्यंत रोखण्यात आले होते. काकांच्या माघारी मिळणारे अर्धे पेन्शन देखील तूर्तास बंद असल्यामुळे काकूंनी पोस्टमनला दहा दिवसानंतर येऊन बघण्यास सांगून वेळ निभावून नेली. काकांची साधी नोकरी आणि एकूण परिस्थिती बेताचीच. पण नामुश्कीचा असा क्षण बघणे काकूंना कधीच अपेक्षित नव्हते. मुलाला चांगले शिक्षण घेता यावे म्हणून सदैव काटकसरीचीच सवय असली तरी किरकोळ पण आवश्यक खर्चाच्या वेळी मात्र कधीही हात आखडता घेतला नव्हता. पूर्ण स्कॉलरशीप मिळूनही त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरखर्च जपूनच करावा लागला, परंतु मुलगा गुणी असल्यामुळे त्याच्या अवांतर खर्चाला देखील कधीही आळा घातला नाही. त्यामुळे पूर्ण स्कॉलरशीप मिळूनही त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरखर्च जपूनच करावा लागला. परदेशातील नोकरीवर दुसर्या खेपेलाही शिक्कामोर्तब झाले तेव्हा मुलगा दुरावणार ह्या विचाराने काका-काकू खिन्न झाले, पण मुलाला समाधानी पाहून त्याला रोखण्याचे साहस दोघांनाही झाले नाही. पहिल्या खेपेदरम्यान अद्यायावत् पश्चिमी देशाला सरावलेला मुलगा दुसर्या खेपेलाही परदेशात सहज रुळला. हळूहळू मायदेशाविषयीची आपुलकी कमी होऊ लागली. कधी ज्या मातीत रमला त्याच मातीचा गंध मुलाला रोखून धरण्यात असमर्थ ठरला. सुरुवातीस वर्षातून दोन वेळा होणारी मायदेशाची वारी दोन वर्षांत एकदा होऊ लागली. नियमितपणे येणारी पत्रे आधी वरचेवर आणि पश्चात एखाद्या वेळीच येऊ लागली. लिहिणे कष्टाचे आणि फोन सोयीचा वाटू लागला. एरवी खंबीर वाटणारे काका-काकू मुलाच्या झपाट्याने बदललेल्या स्वभावामुळे खजील झाले.
विजेची आणि पाण्याची बिले भरण्याच्या रांगेत ताटकळत उभे राहणे, अर्धे पेंशन लागू होईपर्यंत जवळजवळ वर्षभर काकांच्या कचेरीचे उंबरठे झिजवणे, चोरीच्या भीतीने दर खेपेला अगदी मोजकीच रक्कम काढण्यासाठी वारंवार बँकेच्या वार्या करणे, ह्या आणि काकांच्या माघारी ओघाओघाने आलेल्या अशा नाना जबाबदार्या पार पाडतापाडता काकूंना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू लागला. एकदा त्यांच्या आजारपणामुळे विजेचे बिल भरण्याची शेजारच्याला विनंती करण्याचे निमित्त झाले आणि उत्तर भारतातून उपजीविकेच्या शोधार्थ विदर्भात आलेला जगदीश घरचाच होऊन गेला. त्याचे मराठमोळ्या जेवणाचे वेड पाहून त्याची पत्नीदेखील काकूंकडून मराठी पाककलेचे धडे घेऊ लागली. एकदा जगदीशच्या सासूबाई सणासुदीला पाहुणी म्हणून आल्या असता नातवाच्या पानात तुपातल्या पराठ्यांऐवजी साजूक तूप घातलेले साधे वरण चपाती बघून चाटच पडल्या. कोकणातून विदर्भात आलेल्या काकूंनाही वर्हाडी खाद्यपदार्थांची आवड अगदी नकळत आणि मोजक्याच कालावधीत जडली होती. बर्याच वर्षांपूर्वी एकदा काकूंकडे दिवाळीस म्हणून त्यांची आत्या आली, तेव्हा गोळा-भाताचा बेत होता. कढवलेले तेल भातावर घालून आत्याने पहिला घास घेतला आणि चिंचेचे सार फुर्र करून पिताना ठसकाच लागला. “अगदी थेट वर्हाडी झालीस गों .... वत्सलें .....” आत्याने ठसक्यातून सावरून म्हटले आणि खो खो करीत पुन्हा ठसका लागेपर्यंत मनमुराद हसली.
दिवाणावर पडल्यापडल्या विचारात हरवून केव्हा डोळा लागला ते काकूंना कळलेच नाही. काळोख पडायला जरासाच अवकाश होता. रोजच्या नेमानुसार काकूंनी तुळशीशेजारी दिवा ठेवला आणि अंगणात राहून गेलेली जगदीशच्या मुलाची लहानशी तीन चाकी सायकल घरात घेतली. त्याची अर्धी खेळणी काकूंकडेच मुक्कामास असायची. अधूनमधून त्या मायलेकांचा देखील मुक्काम पडायचा. जगदीश कोर्टकचेरीच्या कामाने त्याच्या गावी एकटाच जात असे. सुव्यवस्थेचे तिथे धिंडवडे निघाल्याचे तो सांगत असे. त्याच्या पत्नीने लग्नाच्या वेळी त्याचे घर आणि गाव पाहिले तेवढेच. मुलाला त्याने गावी अजून नेलेच नव्हते. पण दर खेपेस परतला की त्याच्या मूळ स्थानाविषयी भरभरून बोलायचा. मातीशी नाते तुटल्याचे दुःख त्यास बोचत असे, पण परतण्यासारखी स्थिती तिथे उरली नव्हती. ज्यांना शक्य होते त्यांची बिर्हाडे स्थलांतरित झालेली, आणि उरलेली नाइलाजास्तव टिकलेली. अवघ्या गडावर सत्ता चोर-लुटारू आणि नराधमांची. “केव्हा संपणार रे बाबा हे सर्व ... पुरुषोत्तमा ....” रात्रीचे जेवण उरकून ओटा-गॅस पुसता पुसता काकू पुटपुटल्या. निजायला अवकाश असल्यामुळे पुन्हा समोरच्या खोलीत आल्या. बराच वेळ विचार केल्यानंतर मनातली सगळी खिन्नता बाजूला सारून आणि निराशा झटकून काकूंनी पार्सल उघडले. दिवाळीचा अहेर म्हणून मुलाने कॉर्डलेस फोन पाठवला होता. चमकदार कागदात गुंडाळलेले मातृप्रेमाचे पोस्त! गत अनेक वर्षांत मनाच्या तारा एकेक करीत तुटत गेल्या होत्या. नकळतच, पण किती समर्पक अहेर मिळाला होता; बिन‘तारी’ बोलू शकणार्या गोजिरवाण्या खेळण्याचा!
*****
01 August, 2017
स्पेक्ट्रम
माझ्या लहानपणी आई घराच्या अंगणातच भाजीपाल्याची लागवड करायची. बऱ्याचदा भाजी तोडून आणण्याचे काम ती माझ्यावर सोपवीत असे. मी देखील आनंदाने मातीत खेळण्याची ती संधी घालवीत नसे. “कोवळी कोवळी पाने खुडायची, बरं का....” माझ्या हाती टोपली देत आई सांगत असे. कोरड्या लाल मिरच्या घालून केलेल्या चवळीच्या खरपूस भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. तव्यावरून नुकत्याच काढलेल्या चपातीबरोबर ती खाण्याच्या स्वर्गीय सुखात, भाजी खुडताना झालेल्या बोटांच्या करड्या टोकांचा लगेच विसर पडायचा. एकेक वर्ग पुढे जात विज्ञान शिकत गेलो, तसे तसे सृष्टीचे रहस्य उमगू लागले. मनुष्य आणि प्राण्यांमध्ये असते तसलेच काहीसे जाळे वृक्षवल्लिंच्याही अंतरंगात असते, आणि त्यावाटे विविध द्रव्यांच्या सहाय्याने पोषक तत्त्वांचे वहन होऊन पाने, फुले, फळे बहरतात हे जाणून सुखद विस्मय झाला. माझ्या एका शालेय पाठ्यपुस्तकात जगदीशचंद्र बोसांवर आधारित धडा होता. वृक्षवल्लिंनाही भावना असतात आणि यातना होतात हे विविध यंत्रांच्या सहाय्याने बर्याच वर्षांपूर्वी त्यांनी सिद्ध करून दाखविले होते. जगभर मान्यता प्राप्त झालेले ते संशोधन वाचले, आणि भाजी खुडताना झालेल्या बोटांच्या करड्या टोकांचे कोडेही उलगडले. “अंधार पडल्यानंतर पाना-फुलांना हात लावून त्रास देऊ नये, निजलेली असतात ती” लहानपणी खोटे खोटे वाटणारे हे आजीचे शब्द खरे वाटू लागले. त्यापुढील वर्गांमध्ये मानवी कान व डोळे एका विशिष्ट वेवलेंग्थ च्या अलीकडे आणि पलीकडे ऐकू व बघू शकत नाही हे गुपितही कळले. भाजीची पाने खुडणे असो अथवा कीटनाशकांच्या मदतीने किड्या-मुंग्यांचा जाच कमी करणे; केवळ जे लाल वाहील तेच रक्त आणि ऐकू येते तीच किंकाळी ह्या संकल्पना मोडीत निघाल्या. निव्वळ प्राणीहत्या म्हणजेच जीवहत्या आणि पाप ह्या व्याख्या अपुर्या वाटू लागल्या.
वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, वास्तविक कुठल्याही सजीवाला स्वतःच्या अस्तित्वासाठी सजीव वस्तूंवरच अवलंबून राहवे लागते. सजीव वस्तूंची भविष्यातली दुर्मिळता हेरून, बुद्धीच्या जोरावर आणि विज्ञानाचा सदुपयोग करून मानवाने सजीवाला निर्जीव पर्याय देखील शोधले. पण खाद्यसामुग्री, वस्त्रे, पादत्राणे, इतर दैनंदीन गरजेच्या वस्तू, इतकेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात देखील काही वनस्पतीजन्य वस्तूंना आजवर पर्याय लाभलेच नाहीत. काहींना आहेत परंतु गैरसोयीचे अथवा अपुरे. हेच विधान प्राण्यांपासून निर्मित वस्तूंसाठी देखील लागू पडते. मुद्दा पाप-पुण्याचा नसून मानवी अस्तित्वासाठीच्या सोयींचा, प्रगतीकरिता असलेल्या संघर्षाचा आणि मानवाच्या जाणीवेच्या अपुर्या क्षमतेचा आहे. सृष्टीवर विजय मिळवून मानवाने स्वतःचे अस्तित्व टिकविले. प्रगतीच्या त्याच्या संघर्षात सजीवाची आहुति अपरिहार्यच ठरली. सृष्टीच्या प्रत्येक घटकाच्या अतुलनीयतेची कधी जाणीवच नव्हती असे नव्हे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ सारख्या रचना वाचून-ऐकूनच मानव लहानाचा मोठा झाला. पण जीवनाच्या रणधुमाळीत ह्या शब्दांचे सार ग्रहण करावयाचे राहून गेले. ‘वदनी कवळ घेता’ सारखी सुवचने वदूनच एके काळी आपल्याकडे प्रत्येक भोजनाची सुरुवात होत असे. अन्नाचा एकही कण वाया जाऊ न देता पान स्वच्छ करून श्लोक आचरणात आणावा लागत असे. अन्नाची महती सांगणारे ह्यासारखे श्लोक काळाच्या ओघात मोजक्याच प्रसंगी म्हणू जाऊ लागले आणि अन्नाच्या पूर्णब्रह्मत्वाची उजळणी न झाल्याने ‘लेफ्ट ओव्हर’ चे ढिगारे उंची गाठू लागले. एका ठराविक वेवलेंग्थच्या घेर्यातच ऐकू व बघू शकणार्या मानवाने प्राणीहत्येलाच अधिक संवेदनशील मानले. एक्सप्रेस हाय-वे सारख्या अत्याधुनिक सोयींसाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड असो, अथवा लहान रेस्टॉरंट ते धनदांडग्यांच्या ‘बिग फॅट वेडिंग’ मध्ये होणारी अन्नाची नासाडी; दोन्ही बाबी प्राणीहत्येइतक्याच क्लेशदायक व संवेदनशील, पण जीवहत्येच्या रूढ व्याख्येत स्थान न मिळालेल्या. दृष्टीआड सृष्टी असते. दैनंदीन वापरातल्या वस्तूंच्या निर्मितीत किती आणि कुठल्या सजीवांचे बळी गेले, ह्याची जराही जाणीव न ठेवता आपण त्यांचा वापर तर करीतच राहतो.
वैद्यकीय अभ्यासक्रमात मानवी शरीराची अतिशय सुरेख, नीटनेटकी आणि प्रतिकृती निर्माण करण्यास अशक्य असलेली अद्भुत रचना शिकून सृष्टी किती अफाट आणि अगम्य आहे याची प्रचीति आली. मानवाच्या असंख्य भावना, जाणीवा व त्याच्या असामान्य कल्पनाशक्तीशीही परिचय झाला. परंतु त्याचबरोबर त्याच्या कमतरताही उमजल्या आणि मानव त्याच्या मेंदूचा काही भाग उपयोगात आणतच नसल्याचेही कळले. असेच एका तासाला अल्ट्रासाऊंड, एक्स-रे, इन्फ्रारेड लहरींसोबत इतर तरंगांबद्दलही माहिती मिळाली. “........ बिकॉज दीज आर बियाँड युअर ऑडिबल अँड व्हिजिबल स्पेक्ट्रम.” खणखणीत स्वरात सरांनी सांगितले आणि स्पेक्ट्रमच्या मर्यादेतच ऐकू-बघू शकणार्या मानवाच्या संवेदनशीलतेचे व जाणीवेच्या कुवतीचे भौतिक अपुरेपण प्रकर्षाने जाणवले. ह्यातले भौतिकशास्त्र क्षणभर बाजूला सारून वेगळ्या अनुषंगाने विचार केला असता वाटते, की खरच, व्यक्तिगत जीवनातदेखील एका विशिष्ट स्पेक्ट्रम च्या अलीकडे व पलीकडे, आपल्याला ऐकू येत नाही, दिसत नाही, आणि जाणवत तर अजिबात नाही!
*****
01 August, 2017
टिळक
“...... आणि माझ्या
बंधु-भगिनींनो, आज एक ऑगस्ट, टिळक पुण्यतिथी ....” वर्तमानपत्र वाचण्यास घेतले,
आणि शालेय जीवनात केलेल्या भाषणांची तीव्रतेने आठवण झाली. टिळकांची करारी मुद्रा आजही
सर्वांगावर रोमांच उभे करते. सत्याचीच कास सदैव धरावी असा संदेश देणारी ती भाषणे आजही
कानाशी तशीच निनादतात. खुर्चीवर उभे राहून, हाताची घडी घालून, मोठ्या आवाजात बोलतानाची
शालेय गणवेषातील स्वतःची बालमूर्ती आठवली, आणि ओठांवर आपसुकच स्मित आले. प्रत्येकाच्या
भाषणाचा शेवट मात्र सारख्याच शब्दांनी होत असे ... “आणि याबरोबरंच मी माझे भाषण संपवतो/संपवते,
जय हिंद, जय भारत!”
शालेय जीवनात हृदयी उमटलेला टिळकांचा ठसा आजवर
पुसट देखील झाला नाही. आज पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची
उजळणी करीत असता उचंबळून आले खरे, पण आजच्या पोकळीची जाणीव होऊन मन विषण्ण देखील झाले.
भारतीय संस्कृतीची एक ओळख असलेली सहिष्णुता आज बळजबरीच्या सहनशीलतेची समानार्थी झाली
आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात, मग ते शासकीय असो अथवा खाजगी, शैक्षणिक असो वा व्यावसायिक,
कमालीची उदासीनता आहे. रहदारीचे नियम कसे पाळावेत ह्या ऐवजी आपण भावी पीढीला नियम न
पाळल्याने होणार्या कारवाईत ‘मॅनेज’ कसे करावे ह्याचेच धडे अधिक देतो. पूर्वीची आडवळणे
आज हमरस्ता होऊ बघताहेत. दररोज सीमोल्लंघन करणार्या भ्रष्टाचाराची सीमारेखाच अदृश्य
झाली आहे. व्यंगचित्रे साधे स्मित देखील आणण्यात असमर्थ होण्याइतका तो सर्वदूर मुरलाय.
कमालीची दूरदर्शिता दाखवून स्वातंत्र्यपूर्वकाळात उदात्त आणि राष्ट्रवादी हेतुने
आरंभिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवास अशोभायमान स्वरूप बहाल करून आपण दशकांपासून करीत
आलेल्या टिळकांच्या अपमानाची नोंद कुठल्या खात्यावर करावी? तीच गत शिवजयंतीची! शाहिस्तेखानाची
बोटे छाटणारा, आणि वाघनखांनी अफजलखानास यमसदनी धाडणारा तो शिवाजी; एवढीच काय ती शिवरायांची
ओळख करवून घेतलेल्या अनुयायांना खरा शिवबा कधी गवसलाच नाही; आणि त्या दृष्टीने त्यांनी
कधी प्रयत्नही केले नाहीत. विवेकपूर्ण शासन, शेती-संवर्धन, प्रभावी कर प्रणाली, अंतर्गत
सुरक्षा, सर्वधर्मसमभाव, जातीय सलोखा, हे आणि अन्य अनेक गुंतागुंतीचे सामाजिक व राष्ट्रीय
पैलू अगदी लीलया हाताळणार्या छत्रपतींची प्रतिमा तोरण, झेंडे आणि माल्यार्पणासारख्या
शिष्टाचारांनी झाकाळून जाते. बहुतांश सार्वजनिक शिवजयंती समारोहांमध्ये समाज प्रबोधनाचा
हेतू साकार झालेला तूर्तास तरी दिसत नाही. “मी शेंगा खाल्या नाही, मी मार खाणार नाही”
असे निर्धाराने मास्तरांना सांगणारे टिळक अन्यायाविरुद्धचा ‘झीरो टॉलरन्स’ नकळत शिकवून
गेले, पण आज झीरो टॉलरन्स देखील अंगावर बेतू लागला आहे. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे
काय?” असा तडक प्रश्न इंग्रज सरकारला करून खटला ओढवून घेणार्या टिळकांच्या प्रेरणेने
आज काही लोक तसलेच धाडस करू पाहतात; परंतु अशांवर आजही रोष ओढवून घेण्याचीच वेळ येते,
याहून मोठे दुर्दैव ते कोणते?
वर्तमानपत्राच्या अग्रलेखात टिळकांना मिळालेली ‘स्पेस’ संतोषजनक होती.
मी न राहवून संपादकांना फोन करून आभार प्रकट केले. जागेअभावी लिहिता न आलेली आणखी काही
माहिती संपादकांनी पुरविली. तत्कालीन काही सामाजिक तत्त्वांबाबत टिळकांची भूमिका प्रतिगामी
असल्याची नोंद इतिहासात आढळते. इतर काही घटनांच्या वादाचा भोवरा देखील आढळतो. पण त्यांच्या
एकूण कार्यालेखात हे तपशील निव्वळ एका नोंदेइतपतच जागा व्यापू शकतील. संपादकांशी चर्चा
आटोपली, आणि ‘झालेत बहु, होतील बहु, .......’ या जुन्या वचनाची आठवण होऊन
मी विचारमग्न झालो.
आणखी किती काळ सत्ययुगाची प्रतीक्षा? टिळक, पुनर्जन्म जर वास्तविकता असती तर
किती बरे झाले असते हो!
■ टिळक स्मृतिदिन
*****
15 August, 2017
खरा तो एकची
पहाटे उठल्यापासूनच कुमार अस्वस्थ होता.
एरवी शांत असलेल्या देहबोलीतील बदल गड्यालादेखील सकाळी चहाचा कप हाती देतानाच ध्यानात
आला होता. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठला होती, पण भूतकाळ पुन्हा जगण्याची उत्सुकता
कुमारला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे न्याहारीदेखील न घेता सातलाच स्वारी शाळेत दाखल
झाली. पहिल्या माळ्यावरची तुकडी ‘ब’. टेबल, खुर्ची, बाक, सगळे जुन्यासारखेच होते. काळ्याऐवजी
हिरवा फळा हाच काय तो बदल. अगदी दाराची कडीदेखील जुनीच. वर्गात पाऊल ठेवताच सबंध भूतकाळ
कुमार भोवती गिरक्या घेऊ लागला.
प्रसूति नंंतर झालेल्या रक्तस्रावामुुुळे काही तासांंतच कुमारच्या आईने कायमचा निरोप घेतला. बाळाची आई गेल्याची जखम निश्चितच
खोल होती, पण धीर खचून भागणार नव्हते. एका डोळ्यात अश्रू आणि दुसर्यात केवळ बाळासाठी
उसने हसू आणून आजीपासून सगळ्यांनी कंबर कसली. सगळ्या नातेवाईकांनी आळीपाळीने सुरुवातीचे
दोन महीने वेळ निभावून नेली. पण प्रत्येकामागे प्रपंच उभा; शेवट आजीवरच सगळा
भार आला. निधड्या छातीने प्रसंगाला सामोरे जाऊन अगदी बाळाच्या मालिशपासून सगळे
कसे तिने नेटाने सावरले. पण इतरांसारख्याच तिलादेखील जबाबदार्या चुकणार त्या कशा.
बाळाच्या उष्टावणानंतर फार कष्टाने तिने गावी परतण्याकरिता मनाची तयारी केली. सदानंदचा
धीर जरा खचतोय असे पाहून कुमारच्या मावशीने एखादी दिवसभराची आया बाळाच्या सांभाळाकरिता
नेमण्याचे सुचविले. दोन-तीन ठिकाणी निरोप गेले. दोन दिवसानंतर एका गृहस्थाने येऊन विचारले,
“जी, बच्चे को सँभालने के लिए आया चाहिए ऐसा बताया किसीने।” गेल्या दीड-दोन वर्षांत
फक्त चेहर्यानेच माहीत असलेल्या त्याच आळीतील त्या गृहस्थाकडे आश्चर्याने बघून सदानंद
म्हणाला, “हाँ, चाहिए तो है .......... नाम?” “जी, मेरा नाम जावेद”, तो गृहस्थ म्हणाला.
सर्वांच्या लगेच उंचावलेल्या भुवया जावेदच्या चटकन लक्षात आल्या. जावेद जरा हिरमुसलेला
बघून सदानंद म्हणाला, “बाद में बताएँगे.”
दोन दिवसांच्या विचाराअंती दुसरी कुणी
व्यक्ती लक्षात येईपर्यंत तात्पुरती सोय म्हणून सदानंदने जावेदला होकार कळविला. “जी
अच्छा, बहुत मेहरबानी, आज से ही सँभालेंगे”, जावेदने आनंदाने म्हटले आणि लगेच पत्नीला
घेऊन हजर झाला. जावेदची मिळकत बेताचीच असल्याने आधार म्हणून खुरशीदने देखील आनंदाने
जबाबदारी स्वीकारली. तिला स्वतःला मूल नसल्याने ती बाळाचा सांभाळ नीट करू शकेल अथवा
नाही ही सदानंदकरिता चिंतेची बाब होती. सकाळी साडेसातला कचेरीत निघालेला सदानंद सायंकाळी
घरी परतेपर्यंत सदानंदच्याच घरी खुरशीदने बाळाला सांभाळणे सुरू केले. साधारण महिन्याभरात
बाळाने आधी धरलेले बाळसे कायम असल्याचे पाहून सदानंदने आणखी काही दिवस खुरशीदलाच बाळाचा
सांभाळ करावयास सांगितले.
“आज दृष्ट काढा आधी ह्याची”, कुमारच्या पहिल्या वाढदिवसाला म्हणून आलेल्या आजीने अश्रू सावरत म्हटले. “जी वह तो खुरशीद रोज़ उतारती है, आज दोबारा उतार देगी”, जावेद म्हणाला.
ह्या बाबीची जरादेखील कल्पना नसलेली घरची मंडळी चकित तर झालीच, किंचित ओशाळलीदेखील.
कुठलाही ॠणानुबंध नसताना, कुणीही न सुचविता, नियमितरित्या आणि आपुलकीने कुमारची दृष्ट
काढणार्या खुरशीदला घरच्या मंडळींनी झटक्यात पसंतीची पावती दिली आणि तिच्या ‘पर्मनन्ट’
कामावर शिक्कामोर्तब झाले. त्याचबरोबर गेले काही दिवस अडीअडचणीला स्वयंपाक सांभाळून
घेणारा जावेद ‘पूर्ण वेळ स्वयंपाकी’ देखील झाला. वाढदिवसाचा स्वयंपाक दोघांनी मिळूनच
केला. “खूप छान स्वयंपाक केलात दोघांनी”, आजी कौतुकाने बोलली. “जी”, दोघांनी लवून म्हटले.
निव्वळ मिळकतीचे माध्यम म्हणून सुरुवात
केलेल्या खुरशीद आणि जावेदला कुमारचा लळा केव्हा लागला ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.
त्या दोघांचे मायाळू स्वभाव आणि कुमारचे लोभस रूप एकमेकांना पूरक होते. क्वचित खुरशीद
आजारी असली तरी जावेद कुमारचा सांभाळ सहज करून घेई. दोघांच्या कष्टाळू आणि समर्पित
स्वभावामुळे सदानंदनेदेखील किरकोळ बाबी वगळता त्यांना मोकळीक दिली होती. आजी व मावशी
वरचेवर भेटीस येत असत. प्रत्येक भेटीत कुमारकरिता निरनिराळ्या पोषक जिन्नसांच्या पाकक्रिया
खुरशीद आजीकडून शिकून घेत असे. निरोप घेताना दोघे जोडप्याने रीतसर आजीच्या पाया पडत.
आजी स्वतःबरोबर खुरशीदच्याही ओल्या कडा स्वतःच्या पदराने टिपत असे. रिक्षा दृष्टिआड
होईपर्यंत दोघे निश्चल उभी असायची. पहिल्या भेटीत उंचावलेल्या भुवया दर खेपेला हळूहळू
हार मानीत होत्या.
दिवसा जावेदचाचांकडून ‘मछली जल की’
शिकलेला कुमार सायंकाळी बाबा घरी येताच त्यांना जोडे देखील काढू न देता “आधी मारूतीचं
शेपूट वाली गोष्ट सांगा” म्हणत सदानंदला बिलगत असे. दुपारी खुरशीदचाचीच्या हातची
खीर पोटभर खाऊन रात्री मात्र बाबांनी तयार केलेला पौष्टिक काढा बिचारा निमूट प्यायचा.
“शक्तिमान कुणाला व्हायचं?” असे लाडीगोडीने विचारीत सदानंद त्यास काढा पिण्यास भाग
पाडीत असे, आणि काढा पितानाचे त्याचे हावभाव बघून खळखळून हसत असे. दररोज रात्री ओसरीत
फेर्या मारीत, थोपटून कुमारला निजवावे लागे. एके रात्री खांदा का दुखतोय याचा विचार
करीत असता सदानंदला ध्यानात आले, की ज्याला रोज खांद्यावर घेऊन तो थोपटतो ते ‘बाळ’ तब्बल
पाच वर्षांचे व्हायला आले होते. प्रेमभराने सदानंदने कुमारच्या केसांमधून बोटे फिरविली.
दोन भिन्न स्पर्शांनी माती एक निराळाच आकार धारण करीत होती.
दुसर्या दिवशी सकाळी जावेदची बरीच वाट पाहून
नाइलाजाने सदानंद स्वतःच कुमारला घेऊन जावेदकडे निघाला. एरवी सदानंद कचेरीत निघण्याअगोदर
जावेद नेमाने येऊन कुमारला घेऊन जात असे. जावेदच्या घराला कुलूप बघून त्याच्या मनात
शंकेची पाल चुकचुकली. “सुबह तीन बजे ही लेकर गए”, शेजारच्या काकू म्हणाल्या. सदानंदने
कुमारला घेऊन तडक इस्पितळ गाठले. जावेद प्रसूतिकक्षाच्या बाहेरच उभा होता. दोघांना
बघताच तो लगबगीने जवळ आला आणि सदानंदचे दोन्ही हात हातात घेऊन अत्यानंदाने म्हणाला,
“बेटी हुई है भाईजान!” पाकीटाच्या चोरकप्प्यात अडीअडचणीकरिता दुमडून ठेवलेल्या शंभरच्या
दोन नोटा सदानंदने काढल्या आणि ओशाळलेल्या जावेदच्या तळहातावर बळजबरीने ठेवून स्वतःच
त्याची मूठ बंद केली. “और चाहिए तो भी माँग लेना, शरमाना नहीं”, सदानंदने गहिवरून म्हटले.
दोघांनी एकमेकांना दीर्घ आलिंगन दिले. “छोटी बहन के साथ खेलोगे नं?” बावरलेल्या कुमारला
प्रेमाने जवळ घेत जावेदने म्हटले. जावेदचे घर अचानक पाहुण्यांनी गजबजून गेले. सर्वांच्या
ओठांवर हसू आणणारी म्हणून मुलीचे नाव हेतुतः 'तबस्सुम' ठेवले गेले. सदानंदने अगदी सख्ख्या
भावासारखी जावेदची दखल घेऊन सर्वतोपरी मदत करून समारंभ सुखरूप पार पाडला. कुमारला तर गोंडस खेळणेच लाभले होते जणू.
असामान्य आकलनशक्ती आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे
वरदान घेऊन जन्माला आलेल्या कुमारने शैक्षणिक क्षेत्रात आपली घोडदौड सदैव कायम राखली.
बुद्धिमत्तेच्या जोडीला परिश्रमाचे बाळकडू लाभल्याने सर्वात अवघड आणि म्हणूनच सर्वाधिक
प्रतिष्ठित समजली जाणारी प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण होणे त्याला फारसे जड गेले
नाही. सेवेत रुजू झाल्यानंतर अल्पावधीतच एक तडफदार पण शांत आणि सारासार विवेकबुद्धीचा
व्यवस्थापक म्हणून तो नावारूपास आला. त्याची कारकिर्द पाहून त्याच काळात राज्यातील
तीन जिल्ह्यांत एकाच वेळी सांप्रदायिक दंगली उफाळल्याने राज्यपालांकडून त्याला विशेष
नेमणुकीचे आदेश मिळाले.
“सर, प्रिंसिपल मॅडम वाट बघताहेत.” एका विद्यार्थ्याच्या
बोलण्याने कुमार भानावर आला. झरझर पायर्या उतरून खाली आला आणि लगेच मॅडमच्या पाया
पडला. “यशस्वी भव”, कुमारला इतिहास शिकविलेल्या आणि सांप्रत मुख्याध्यापिका असलेल्या
मॅडम कुमारला आशीर्वाद देत म्हणाल्या. अतिसंवेदनशील अशा तीन जिल्ह्यांतील दंगली अत्यंत
प्रभावीपणे केवळ आटोक्यात आणण्यापर्यंतच न थांबता, एक पाऊल पुढे जाऊन दोन गटांमध्ये
सलोखा प्रस्थापित करण्याची जोखमीची कामगिरी फत्ते करून कुमारने एक निराळाच संदेश समाजापर्यंत
पोहचविला होता. त्याच्या ह्या कामगिरीसाठी राज्यपाल आणि राष्ट्रपति असे दुहेरी पुरस्कार
त्याला घोषित झाले होते. त्याची विशेष नियुक्ती ही दोन भिन्न हस्ते घडलेल्या कुमारकरिता
संस्कारांची जणू उजळणी ठरली. ज्या दोन शिकवणींनी त्याला सौहार्दाची व्याख्या सांगितली
त्याच एकमेकींच्या रक्ताचे घोट पिण्यास आतुर झालेल्या कुमारने पाहिल्या. शिस्तप्रिय
आणि आज्ञाधारक असलेल्या कुमारने प्रसंगी शाळेतील मास्तरांच्या छडीचाही स्वाद चाखला
होता खरा; पण त्याला झालेले ताडन त्याला कडक आणि नरम धोरणांचे परिस्थितीनुसार अवलंबन
नकळत शिकवून गेले. घातक तत्त्वांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याने कमालीचे सक्तीचे
धोरण अवलंबिले; पण वाट चुकलेल्यांकरिता तो दीपगृहासारखा धैर्यशील आणि खंबीर उभा राहिला.
हेतुपूर्वक दंगली घडवून पोळ्या शेकणार्या सत्तालोलुप तत्त्वांना त्याने गनिमी कावा रचून
मोठ्या शिताफीने धडा शिकविला. प्रशासकीय सेवेत रुजू होणारे तर अनेक असतात; पण
कुमारने त्याच्या नियुक्तीचे चीज केले होते. ज्या विद्यालयात कुमार घडला त्याच पावन
वास्तूच्या प्रांगणात आज त्याच्या सत्काराचा नयनरम्य सोहळा होता. भूतकाळ आठवून कुमारला
वारंवार गहिवरून येत होते. भाषण तरी नीट वाचणे जमेल की नाही अशी शंका त्याला आली. पाच
दिवस आगाऊच हजेरी लावून ज्या सटवाईने कपाळी मातृवियोग लिहिला; तिनेच ‘पाचवी’ ला आठवणीने
पुनरागमन करून कुमारच्या ललाटावर अखंड धैर्य देखील कोरले होते. लगेच स्वतःला सावरून
कुमार समारोहासाठी सज्ज झाला.
कौतुक
आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत सोहळ्यात कुमारचा रीतसर सत्कार संपन्न झाला. कुमारचे भाषण
आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका समूहाने साने गुरुजी रचित ‘खरा तो एकची धर्म.....’
गायला सुरुवात केली, आणि पहिल्या रांगेत बसलेल्या आजी, मावशी, बाबा, खुरशीदचाची, जावेदचाचा
आणि तबस्सुम ह्यांच्या कडा पाणावल्या. काहींनी टिपल्या, तर इतरांनी खार्याला मनसोक्त
वाहू दिले. कुमारने जोड्याचा कसा व्यवस्थित करण्याचे निमित्त करून खाली वाकून स्वतःचे
डोळे टिपले. गेली कित्येक वर्ष ह्या सगळ्यांच्या माध्यमातून धर्माने कधी आयत ऐकली होती, तर कधी अभंग गायला होता. जो धर्म शीरखुर्मा चाखून तृप्त झाला तोच थेंबभर तीर्थाने कृतार्थही झाला होता. काल आजीच्या पदराने तर आज चाचीच्या चुन्नीने त्याने डोळे टिपले
होते. कधी तो चाचाचे वटारलेले डोळे बघून बावरला तर कधी बाबांवर रुसून मावशीच्या कुशीत
लपला. त्या विशाल प्रांगणात विविध भाषांत धर्माच्या निरनिराळ्या व्याख्या जाणणारे बरेच
होते; पण धर्माची खरी परिभाषा मात्र ह्या मोजक्या साश्रू नयनांनीच जाणली, जगली आणि
जगविली होती. आज पुन्हा एकदा खर्या अर्थाने धर्म प्रेमात न्हाऊन धन्य झाला होता.
■
(काल्पनिक कथा)
(काल्पनिक कथा)
(स्वातंत्र्यदिन विशेष)
(कथा का हिंदी अनुवाद पढ़ने हेतु लिंकः https://jsrachalwar.blogspot.com/2017/09/blog-post.html)
(कथा का हिंदी अनुवाद पढ़ने हेतु लिंकः https://jsrachalwar.blogspot.com/2017/09/blog-post.html)
*****
05 September, 2017
क्षम्यताम् परमेश्वर
रेल्वे ची भीषण दुर्घटना
आणि तथाकथित बाबाच्या अटकेविरोधात उसळलेल्या डोंबाने झालेले श्रीं चे स्वागत हृदयावर
आघात करून गेले. खरे पाहता अशा अप्रिय घटना ही सांप्रत नियमितताच झाली आहे. म्हणूनच
की काय, त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन देखील जरा बोथटच झाला आहे. इतर वेळी अल्प
काळ विचलित करणार्या अशा घडामोडी मंगल प्रसंगी मात्र प्रकर्षाने चटका लावून जातात.
आगमनाच्या दिवशीच गालबोट लागल्याचे पाहून मन खजिल झाले आणि नकळत मुखातून ‘क्षम्यताम्
परमेश्वर’ निघाले.
रेल्वे असो अथवा आस्था, बारकाईने बघता भारतात प्रत्येक क्षेत्र
बिकट पेचात असल्याचेच जाणवते. कुठल्या आघाडीवर पहिली मोहीम आखावी तेच कळेनासे झाले
आहे. ‘गणराय रुसले’ असे म्हणून सगळे वक्रतुंडावर ढकलणे योग्य नाही. आपल्या डोळ्यातले
मुसळ बघणे आपण सोयिस्कररित्या टाळतो. भ्रष्टाचार एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आपली पाळेमुळे घट्ट रोवून बसलाय. मुळांच्या शिरकावाने पोखरलेल्या भिंतींना भगदाडे पडणारच, आणि
घरात पलीकडील उपद्रव शिरणारच. त्या उपद्रवाशी दोन हात करताना कामी आलेल्यांचे तपशील
अंगावर शहारे आणतात. जेवढे संतत हौतात्म्य, तेवढेच सातत्य त्यांच्या प्रति अनास्थेतही
पाहून मन विषण्ण होते. दुरून साजर्या दिसणार्या पारंब्यांच्या विळख्यात देश कासावीस
होतोय. राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण यांच्या घट्ट वीणेच्या पाशात राष्ट्राचा श्वास
गेली कित्येक वर्ष गुदमरतोय. प्रत्येक क्षेत्रात खोलवर रुजलेली अनागोंदी व अंदाधुंदी
पाहून संताप येतो, पण आवळलेल्या मुठींवर ताबा ठेवत तोंड दबलेलेच राहू देऊन बुक्क्यांचा मार सहन
करण्यापलिकडे काहीच करता येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे धिंडवडे निघालेल्या राष्ट्राचे
भवितव्य सुज्ञास सांगणे न लगे.
पण ह्या सगळ्या औदासीन्यात श्रीं चे आगमन नेहमी ‘सुखदायक
भक्तांसी’ असेच असते. मूर्तिची निवड ते आरास, रांगोळी, मखर, सजावट, नैवेद्य इत्यादी गोष्टींच्या
गराड्यात काही काळ का होईना, दुःख जरा विरळ होते; क्वचित विसरही पडतो. आचमनाचे गोविंदाय
नमः म्हणताच निराळा हुरूप येतो. रक्ष रक्ष परमेश्वर म्हणत विघ्नहर्त्याला साकडे
घालताना आजही आचरणात आगळीच निरागसता येते. लंबोदराचे लोभस रूप पाहून किती साठवू
लोचनी म्हणत मी दरवर्षी अतृप्तच राहतो. कर जोडून मुखाने पुण्योऽहम् तव दर्शनात् म्हणेपर्यंत
आज देखील ब्रह्मानंदी टाळी लागते, आणि विसर्जनाचे मोरया म्हणताना अजूनही दाटूनच येते.
दर वर्षी ढोल-ताशांच्या कर्णमधुर कल्लोळात गणराय वाजतगाजत
येतात, आणि दहा दिवस अनंत उत्साह भरून निरोपाच्या घडीला नयनी पूरही आणतात. त्यांनी
मुक्तहस्ते वाटलेल्या बुद्धीस काही भद्रजन सश्रद्ध ग्रहण करतात. म्हणूनच सध्या सुरु
असलेल्या अखंड रणधुमाळीतही देश समाधानाचे चार श्वास घेऊ शकतो. सातत्याने होत असलेल्या
प्रचारामुळे अति कर्मठ लोकांनी देखील प्रदूषण कमी करण्याच्या हेतुने विसर्जनाच्या सुधारित
पद्धती अवलंबिणे, ही गजाननाने दिलेल्या सद्बुद्धीची झलकच म्हणावी लागेल. पर्यावरण
स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने होत असलेल्या प्रयत्नांना मन आणि बुद्धी निर्मळ करण्याच्या
इच्छाशक्तीचीही साथ लाभली तर गणनायकाच्या प्रसादाचा गोडवा काही औरच असेल.
आवळ तव पाश आता, करिण्या
काळ पातकाचा,
लागो अंकुश अधमावर,
तीक्ष्ण तुझ्या बुद्धीचा,
व्हावा मोदकापरी मधुर,
शब्द तो सकळ जनांचा,
होवो भद्र गणांचे,
नायक असे तू ज्यांचा।
कंठ दाटला स्मृतींनी,
ठोका चुकला काळजाचा,
जातो हुरहुर लावुनी,
सहवास औट घटकांचा,
किती रे लपवावा आम्ही,
ओलावा त्या कडांचा,
लवकर परत रे बाप्पा,
धीर सुटत असे आमुचा।
■ गणेशोत्सव