गाड्या हाटेलं बुक झाले सरवे, पाय ठेवाले जागा नाइ उरली,
गुरवारच्याच रात्री सारायनं, समदी यवस्था करून ठेवली,
ब्यागा भरून दारातंच मांडल्या, आफिस सामोरंच गाडी लागली,
सारायची खुशी उतू गेली काउन का जयंतीची सुट्टी रईवारले जोडून भेटली,
बरं झालं का लई आधीच, तुमी वरतं निंगून गेले,
जमलं नसतं तुमच्याच्यानं, आजचा गोंधड बगाले समजाले,
आंधळे जात्यावर दळूनंच राहले, कुत्रे पीठ खाऊनंच राहले,
आज का का हून राहलं, आता कसं सांगू बापू तुमाले.
तुमच्या लेखनी नं सुताच्या धाकानं, गोरे चाल्ले गेल्ते भेऊन,
पन जाताना हात बी जोडले, तुमच्या खर्याची जादू बगून,
त्यायनं त्यायचा देश घडंवला, डोंगर खर्याखर्याचा रचून,
आमी आमचंच दिवाळं फुकलं, खोट्याखोट्या तंद्रीत र्हाऊन,
लोकाजवडं झाकाले कापडं नाई, म्हनून तुमी बी सादेच राहले,
आज दुसर्याले उघडं पाडते, लोकं सवताचे पापं झाकाले,
खाऊन पिऊन बी तोंड आमचं वाकडं, लाखाचं नेसून येते रडाले,
शिकवनीचं तुमच्या गाठोडं बांधलं, आता कसं सांगू बापू तुमाले.
गोर्यानं परिषद भरवली त्याले, तुमी पंचाच नेसून गेल्ते,
तुमाले तशा अवतारात बगून, घोंगडीत बी गोरे कुडकुडले व्हते,
आज मोठ्या घरातलं पावनं, येकाच कापडात गुमान राहते,
उधारीचे कापडं घडीघडी बदलू, झोपडीतला सोंगाड्या मिजास दाखवते,
झोपडीच्या छपराचे शेद्रं सरवे, दिसूनंच जाते मोठ्या पावन्याले,
थो बी मंग लई इतरते, सोंगाड्याचे लेकरं धरून वेठीले,
सोंगाड्यानं देल्लं वार्यावरतं सोडून, कोटं जावं लेकरानं पोट भराले,
उघडे नं पोरके झाले लेकरं, आता कसं सांगू बापू तुमाले.
पइले तुमच्या येकट्याच्याच उपासानं, घाम सुटून जाय गोर्याले,
आज उपाशी लेकराइचा कल्ला बी, ऐकाची फुरसत नाइ कोनाले,
तुमी सरवे तुकडे जवडं आनले, सोबत घेऊघेऊ जोडलं सारायले,
आज करूकरू तुहं नं माहं, सारायनं वाटून टाकलं देशाले,
खुर्चीसाठी समदे पगले व्हते, कमी नाइ करंत मारा कापाले,
वावरात कास्तकार मेले कित्ती गी, डोळे कोनाचेच व्हंत नाइ वले,
कोनाचंच काडिज हालंत नाइ जर्रा, जवान किती बी रगंत न्हाले,
मानसाले मानुस पारखं झालं, आता कसं सांगू बापू तुमाले.
तुमी म्हनलं का सहन करा, पन किती करा हे नाइ बोलले,
काटा काट्यानंच काढा लागते, हे बी शिकवनं इसरून गेले,
पइले व्हतं ते गोर्याइनं लुटलं, आज आपलेच लुबाडुन राहले,
तवा बोलाची सोय नव्हती, आज बी भेवंच लागते सांगाले,
बगन्या ऐकन्या बोलन्या सोबत, करू बी नका वाईट सांगाले,
तिघा वानरासोबत चवथा, बसवाले तुमी भुलुनंच गेले,
त्याच चवथ्याच्या मस्ती तंद्रीनं, काडी लावली सारायच्या घरट्याले,
पुरं जंगल भाजूभाजू करंपलं, आता कसं सांगू बापू तुमाले.
सारायचे खिसे वलेवले गच्चं, पन माह्या पिकाले थेंब नाइ जिरला,
किरकेटच्या डावाले पाटातलं पानी, वाटूवाटू डाव माहाच संपून गेला,
सरवे मेट्रो नं बुलेटच्याच मांगं, जुन्या पटरीले वालीच नाई उरला,
गोटे रंगूरंगू दीस गेला संपून, गटारं झाकाले वेळंच नाइ भेटला,
जो बी येते थो हेच म्हनते, का थोच आता तारंल सारायले,
समदे मडके घेऊन पसार होते, बाकिच्याले लाउन उकरडे फुकाले,
कोनाच्या जवडं गार्हानं गावं, समजूनंच नाइ राहलं कोनाले,
सारायनंच झोपेचं सोंग घेतलं, आता कसं सांगू बापू तुमाले.
पन आता भेउन चालनार नाइ, धरावाच लागंन खर्याचा रस्ता,
घर सावडाले तुमी लिवलं, तस्संच वागा लागंन आता,
घरच्याच मातीच्या इटा उभ्या करून, पावन्याले झुकवा लागंन आता,
मातीतनं धूर सोन्याचा काढाले, लोकालेच नळी फुका लागंन आता,
ह्या पंचाइतीत नुस्कानीचा मार, झेलाच लागंन थोडाथोडा सारायले,
आमाले काइ नाइ भेटलं तरी, लेकराले तं मिळंल चांगलं भोगाले,
आमचं आमालेच निस्तरा लागते, म्हनून सांगनारंच नव्हतो तुमाले,
पन राहवलंच नाइ सांगितल्या बिगंर, आता कसं सांगू बापू तुमाले.
(गांधी जयंती)
(वर्हाडी अभिवादन)