15 August, 2017

‘खरा तो एकची’

    पहाटे उठल्यापासूनच कुमार अस्वस्थ होता. एरवी शांत असलेल्या कुमारच्या देहबोलीतील बदल गड्यालादेखील सकाळी चहाचा कप हाती देतानाच ध्यानात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठला होती, पण भूतकाळ पुन्हा जगण्याची उत्सुकता कुमारला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे न्याहारीदेखील न घेता सातलाच स्वारी शाळेत दाखल झाली. पहिल्या माळ्यावरची तुकडी ‘ब’. टेबल, खुर्ची, बाक, सगळे जुन्यासारखेच होते. काळ्याऐवजी हिरवा फळा हाच काय तो बदल. अगदी दाराची कडीदेखील जुनीच. वर्गात पाऊल ठेवताच सबंध भूतकाळ कुमारभोवती गिरक्या घेऊ लागला.

    प्रसूतिनंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळे अवघ्या काही तासांतच कुमारच्या आईने कायमचा निरोप घेतला. बाळाची आई गेल्याची जखम निश्चितच खोल होती, पण धीर खचून भागणार नव्हते. एका डोळ्यात अश्रू आणि दुसर्‍यात केवळ बाळासाठी उसने हसू आणून आजीपासून सगळ्यांनी कंबर कसली. सगळ्या नातेवाईकांनी आळीपाळीने सुरुवातीचे दोन महीने वेळ निभावून नेली, पण प्रत्येकाच्या मागे प्रपंच उभा; शेवट आजीवरच सगळा भार आला. निधड्या छातीने प्रसंगाला सामोरे जाऊन अगदी बाळाच्या मालिशपासून सगळे तिने नेटाने सावरले; पण इतरांसारख्याच तिलादेखील जबाबदार्‍या चुकणार त्या कशा. बाळाच्या उष्टावणानंतर फार कष्टाने तिने गावी परतण्याकरिता मनाची तयारी केली. सदानंदचा धीर जरा खचतोय असे पाहून कुमारच्या मावशीने एखादी दिवसभराची आया बाळाच्या सांभाळाकरिता नेमण्याचे सुचविले. दोन-तीन ठिकाणी निरोप गेले. दोन दिवसानंतर एका गृहस्थाने येऊन विचारले, “जी, बच्चे को सँभालने के लिए आया चाहिए ऐसा बताया किसीने.” गेल्या दीड-दोन वर्षांत फक्त चेहर्‍यानेच माहीत असलेल्या त्याच आळीतील त्या गृहस्थाकडे आश्चर्याने बघून सदानंद म्हणाला, “हाँ, चाहिए तो है .......... नाम?” “जी, मेरा नाम जावेद”, तो गृहस्थ म्हणाला. सर्वांच्या लगेच उंचावलेल्या भुवया जावेदच्या चटकन लक्षात आल्या. जावेद जरा हिरमुसलेला बघून सदानंद म्हणाला, “बाद में बताएँगे.”

    दोन दिवसांच्या विचाराअंती दुसरी कुणी व्यक्ती लक्षात येईपर्यंत तात्पुरती सोय म्हणून सदानंदने जावेदला होकार कळविला. “जी अच्छा, बहुत मेहरबानी, आज से ही सँभालेंगे”, जावेदने आनंदाने म्हटले आणि लगेच पत्नीला घेऊन हजर झाला. जावेदची मिळकत बेताचीच असल्याने आधार म्हणून खुरशीदने देखील आनंदाने जबाबदारी स्वीकारली. तिला स्वतःला मूल नसल्याने ती बाळाचा सांभाळ नीट करू शकेल अथवा नाही ही सदानंदकरिता चिंतेची बाब होती. सकाळी साडेसातला कचेरीत निघालेला सदानंद सायंकाळी घरी परतेपर्यंत सदानंदच्याच घरी खुरशीदने बाळाला सांभाळणे सुरू केले. साधारण महिन्याभरात बाळाने आधी धरलेले बाळसे कायम असल्याचे पाहून सदानंदने आणखी काही दिवस खुरशीदलाच बाळाचा सांभाळ करावयास सांगितले.

    “आज दृष्ट काढा आधी ह्याची”, कुमारच्या पहिल्या वाढदिवसाला म्हणून आलेल्या आजीने अश्रू सावरीत म्हटले. “जी वह तो खुरशीद रोज़ उतारती है, आज दोबारा उतार देगी”, जावेद म्हणाला. ह्या बाबीची जरादेखील कल्पना नसलेली घरची मंडळी चकित तर झालीच, किंचित ओशाळलीदेखील. कुठलाही ऋणानुबंध नसताना, कुणीही न सुचविता, नियमितरित्या आणि आपुलकीने कुमारची दृष्ट काढणार्‍या खुरशीदला घरच्या मंडळींनी झटक्यात पसंतीची पावती दिली, आणि तिच्या ‘पर्मनंट’ कामावर शिक्कामोर्तब झाले. त्याचबरोबर गेले काही दिवस अडी-अडचणीला स्वयंपाक सांभाळून घेणारा जावेद ‘पूर्ण वेळ स्वयंपाकी’ देखील झाला. वाढदिवसाचा स्वयंपाक दोघांनी मिळूनच केला. “खूप छान स्वयंपाक केलात दोघांनी”, आजी कौतुकाने बोलली. “जी”, दोघांनी लवून म्हटले.

    निव्वळ मिळकतीचे माध्यम म्हणून सुरुवात केलेल्या खुरशीद आणि जावेदला कुमारचा लळा केव्हा लागला ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. त्या दोघांचे मायाळू स्वभाव आणि कुमारचे लोभस रूप एकमेकांना पूरक होते. क्वचित खुरशीद आजारी असली तरी जावेद कुमारचा सांभाळ सहज करून घेई. दोघांच्या कष्टाळू आणि समर्पित स्वभावामुळे सदानंदनेदेखील किरकोळ बाबी वगळता त्यांना मोकळीक दिली होती. आजी व मावशी वरचेवर भेटीस येत असत. प्रत्येक भेटीत कुमारकरिता निरनिराळ्या पोषक जिन्नसांच्या पाकक्रिया खुरशीद आजीकडून शिकून घेत असे. निरोप घेताना दोघे जोडप्याने रीतसर आजीच्या पाया पडत. आजी स्वतःबरोबर खुरशीदच्याही ओल्या कडा स्वतःच्या पदराने टिपत असे. रिक्षा दृष्टीआड होईपर्यंत दोघे निश्चल उभी असायची. पहिल्या भेटीत उंचावलेल्या भुवया दर खेपेला हळू-हळू हार मानीत होत्या.

    दिवसा जावेदचाचांकडून ‘मछली जल की’ शिकलेला कुमार सायंकाळी बाबा घरी येताच त्यांना जोडे देखील काढू न देता “आधी मारूतीचं शेपूटवाली गोष्ट सांगा” म्हणत सदानंदला बिलगत असे. दुपारी खुरशीदचाचीच्या हातची खीर पोटभर खाऊन रात्री मात्र बाबांनी तयार केलेला पौष्टिक काढा बिचारा निमूट प्यायचा. “शक्तिमान कुणाला व्हायचं?” असे लाडीगोडीने विचारीत सदानंद त्यास काढा पिण्यास भाग पाडीत असे, आणि काढा पितानाचे त्याचे हावभाव बघून खळखळून हसत असे. दररोज रात्री ओसरीत फेर्‍या मारीत, थोपटून कुमारला निजवावे लागे. एके रात्री खांदा का दुखतोय याचा विचार करीत असता सदानंदला ध्यानात आले की ज्याला रोज खांद्यावर घेऊन तो थोपटतो ते ‘बाळ’ तब्बल पाच वर्षांचे व्हायला आले होते. प्रेमभराने सदानंदने कुमारच्या केसांमधून बोटे फिरविली. दोन भिन्न स्पर्शांनी माती एक निराळाच आकार धारण करीत होती.

    दुसर्‍या दिवशी सकाळी जावेदची बरीच वाट पाहून नाइलाजाने सदानंद स्वतःच कुमारला घेऊन जावेदकडे निघाला. एरवी सदानंद कचेरीत निघण्याअगोदर जावेद नेमाने येऊन कुमारला घेऊन जात असे. जावेदच्या घराला कुलूप बघून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. “सुबह तीन बजे ही लेकर गए”, शेजारच्या काकू म्हणाल्या. सदानंदने कुमारला घेऊन तडक इस्पितळ गाठले. जावेद प्रसूतिकक्षाच्या बाहेरच उभा होता. दोघांना बघताच तो लगबगीने जवळ आला आणि सदानंदचे दोन्ही हात हातात घेऊन अत्यानंदाने म्हणाला, “बेटी हुई है भाईजान!” पाकीटाच्या चोरकप्प्यात अडी-अडचणीकरिता दुमडून ठेवलेल्या शंभरच्या दोन नोटा सदानंदने काढल्या आणि ओशाळलेल्या जावेदच्या तळहातावर बळजबरीने ठेवून स्वतःच त्याची मूठ बंद केली. “और चाहिए तो भी माँग लेना, शरमाना नहीं”, सदानंदने गहिवरून म्हटले. दोघांनी एकमेकांना दीर्घ आलिंगन दिले. “छोटी बहन के साथ खेलोगे नं?” बावरलेल्या कुमारला प्रेमाने जवळ घेत जावेदने म्हटले. जावेदचे घर अचानक पाहुण्यांनी गजबजून गेले. सर्वांच्या ओठांवर हसू आणणारी म्हणून मुलीचे नाव हेतुतः तबस्सुम ठेवले गेले. सदानंदने अगदी सख्ख्या भावासारखी जावेदची दखल घेऊन सर्वतोपरी मदत करून समारंभ सुखरूप पार पाडला. कुमारला तर एक गोंडस खेळणेच लाभले होते जणू.

    असामान्य आकलनशक्ती आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे वरदान घेऊन जन्माला आलेल्या कुमारने शैक्षणिक क्षेत्रात आपली घोडदौड सदैव कायम राखली. बुद्धिमत्तेच्या जोडीला परिश्रमाचे बाळकडू लाभल्याने सर्वात अवघड आणि म्हणूनच सर्वाधिक प्रतिष्ठित मानली गेलेली प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण होणे त्याला फारसे जड गेले नाही. सेवेत रुजू झाल्यानंतर अल्पावधीतच एक तडफदार पण शांत आणि सारासारविवेकी व्यवस्थापक म्हणून तो नावारूपास आला. त्याची कारकिर्द पाहून त्याच काळात राज्यातील तीन जिल्ह्यांत एकाच वेळी सांप्रदायिक दंगली उफाळल्याने राज्यपालांकडून त्याला विशेष नेमणुकीचे आदेश मिळाले.

    “सर, प्रिंसिपल मॅडम वाट बघताहेत.” एका विद्यार्थ्याच्या बोलण्याने कुमार भानावर आला. झरझर पायर्‍या उतरून खाली आला आणि लगेच मॅडमच्या पाया पडला. “यशस्वी भव”, कुमारला इतिहास शिकविलेल्या आणि सांप्रत मुख्याध्यापिका असलेल्या मॅडम कुमारला आशीर्वाद देत म्हणाल्या. अतिसंवेदनशील अशा तीन जिल्ह्यांतील दंगली अत्यंत प्रभावीपणे केवळ आटोक्यात आणण्यापर्यंतच न थांबता, एक पाऊल पुढे जाऊन दोन गटांमध्ये सलोखा प्रस्थापित करण्याची जोखमीची कामगिरी फत्ते करून कुमारने एक निराळा संदेश समाजापर्यंत पोहचविला होता. त्याच्या ह्या कामगिरीसाठी राज्यपाल आणि राष्ट्रपती असे दुहेरी पुरस्कार त्याला घोषित झाले होते. त्याची विशेष नियुक्ती ही दोन भिन्न हस्ते घडलेल्या कुमारकरिता संस्कारांची जणू उजळणी ठरली. ज्या दोन शिकवणींनी त्याला सौहार्दाची व्याख्या सांगितली त्याच एकमेकींच्या रक्ताचे घोट पिण्यास आतुर झालेल्या कुमारने पाहिल्या. शिस्तप्रिय आणि आज्ञाधारक असलेल्या कुमारने प्रसंगी शाळेतील मास्तरांच्या छडीचाही स्वाद चाखला होता खरा; पण झालेले ताडन त्याला कडक आणि नरम धोरणांचे परिस्थितीनुसार अवलंबन नकळत शिकवून गेले. घातक तत्त्वांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याने कमालीचे सक्तीचे धोरण अवलंबिले; पण वाट चुकलेल्यांकरिता तो दीपगृहासारखा धैर्यशील आणि खंबीर उभा राहिला. हेतुपूर्वक दंगली घडवून पोळ्या शेकणार्‍या सत्तालोलुप तत्त्वांना त्याने गनिमी कावा रचून मोठ्या शिताफीने धडा शिकविला. प्रशासकीय सेवेत रुजू होणारे तर अनेक असतात; पण कुमारने त्याच्या नियुक्तीचे चीज केले होते. ज्या विद्यालयात कुमार घडला त्याच पावन वास्तूच्या प्रांगणात आज त्याच्या सत्काराचा नयनरम्य सोहळा होता. भूतकाळ आठवून कुमारला वारंवार गहिवरून येत होते. भाषण तरी नीट वाचणे जमेल की नाही अशी शंका त्याला आली. पाच दिवस आगाऊच हजेरी लावून ज्या सटवाईने कपाळी मातृवियोग लिहिला; तिनेच ‘पाचवी’ ला आठवणीने पुनरागमन करून कुमारच्या ललाटावर अखंड धैर्य देखील कोरले होते. लगेच स्वतःला सावरून कुमार समारोहासाठी सज्ज झाला.

    कौतुक आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत सोहळ्यात कुमारचा रीतसर सत्कार संपन्न झाला. कुमारचे भाषण आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका समूहाने साने गुरुजी रचित ‘खरा तो एकची धर्म.....’ गायला सुरुवात केली, आणि पहिल्या रांगेत बसलेल्या आजी, मावशी, बाबा, खुरशीदचाची, जावेदचाचा आणि तबस्सुम ह्यांच्या कडा पाणावल्या. काहींनी टिपल्या, तर इतरांनी खार्‍याला मनसोक्त वाहू दिले. कुमारने जोड्याचा कसा व्यवस्थित करण्याचे निमित्त करून खाली वाकून स्वतःचे डोळे टिपले. गेली कित्येक वर्ष ह्या सगळ्यांच्या माध्यमातून धर्माने कधी आयत ऐकली होती, तर कधी अभंग गायला होता. जो धर्म शीरखुर्मा चाखून तृप्त झाला, तोच थेंबभर तीर्थाने कृतार्थ ही झाला होता. काल आजीच्या पदराने तर आज चाचीच्या चुन्नीने त्याने डोळे टिपले होते. कधी तो चाचाचे वटारलेले डोळे बघून बावरला तर कधी बाबांवर रुसून मावशीच्या कुशीत लपला. त्या विशाल प्रांगणात विविध भाषांत धर्माच्या निरनिराळ्या व्याख्या लिहून दाखवू शकणारे बरेच होते; पण धर्माची खरी परिभाषा मात्र ह्या मोजक्या साश्रु नयनांनीच जाणली, जगली आणि जगविली होती. आज पुन्हा एकदा खर्‍या अर्थाने धर्म प्रेमात न्हाऊन धन्य झाला होता.

*****
(काल्पनिक कथा)
Independence Day
Link for Hindi adaptation of the story: https://jsrachalwar.blogspot.com/2017/09/blog-post.html
# Communal harmony, Freedom, Indepenence, Peace

13 August, 2017

• पार्थिव

     सनातन जीवनपद्धति में श्राद्ध विधि का विशेष महत्त्व है। चावल के पिंड को जब तक कौआ चोंच से स्पर्श नहीं करता, तब तक मृत व्यक्ति की उसके जीवित क्षण में कोई इच्छा अपूर्ण रही होगी ऐसा माना जाता है। श्राद्ध के दौरान चढ़ाया भोग पितरों तक पहुँचता है ऐसी भी धारणा है। मृतक के परिजनों को यह कहकर सांत्वना दी जाती है, कि मृत व्यक्ति उनके आसपास ही अदृश्य रूप में वास करते हैं; और उनकी स्मृति की ऊर्जा से हौसला देते हैं। बचपन में सोचता था, कि क्या वाक़िई ऐसा होता होगा? विज्ञान के अद्भुत आविष्कारों ने यह भी संभव किया है। अब हमारे प्रियजन मृत्यु के पश्चात भी हमारे आसपास बदले हुए रूप में ही, किंतु जीवित रह सकते हैं। आज आधुनिक, अनूठी और हैरत-अंगेज़ तकनीकों से इन्सानी कार्निया, गुर्दे, फेफड़े, यकृत तथा स्वादुपिंड का सफल प्रत्यारोपण सहज संभव है। भारत में आज अंगदान की प्रवृत्ति प्राथमिक अवस्था में है। समाज के कुछ ही स्तर तक इसके प्रति जागरुकता है।

     मेरे पिता ने कई वर्षों पूर्व मेरे युवावस्था में पदार्पण करते ही नेत्रदान के संकल्प पत्र पर उनके साथ मुझसे भी हस्ताक्षर करवाए थे। उसी प्रेरणा से चंद वर्षों पूर्व मैंने अंगदान का भी संकल्प किया। जिन बेहतरीन कार्यों को मैं मेरे जीवित क्षणों में न कर पाऊँ; हो सकता है और मंशा भी यही है, कि मेरे पश्चात मेरे अंग पाकर कोई अन्य व्यक्ति कर दे। आशा है, कि अंगदान एक संस्कृति बन हमें अपना जीवन सार्थक करने की प्रेरणा दे।

श्वास मेरे पा बने फिर, विश्व-शांति दूत कोई,

धन्य हों फिर आत्म मेरे, देख मानवता यों छाई।

Organ Donation Day

(Select lines from my Hindi poetry book)
*****

04 August, 2017

'कैफ़ियत-ए-उल्लू'

बाशिंदा हूँ शाइस्ता, काली गहरी के सन्नाटों का,
ख़ामोश मुसाफ़िर, दरख़्तों की ग़ैर-महदूद सल्तनत का,
कहीं इबादत-ए-दौलतमंद, कहीं फ़िरिश्ता हूँ मौत का,
इन्सान नादाँ क्या जाने, दर्द तनहाई-ए-तारीकी का.

■ International Owl awareness day

(कैफ़ियत-ए-उल्लू-state of affairs of Owl, बाशिंदा-resident, शाइस्ता-polite, दरख़्त-tree, ग़ैर-महदूद-without bounds, सल्तनत-kingdom, इबादत-ए-दौलतमंद-worship by rich, फ़िरिश्ता-messenger, नादाँ-silly, तनहाई-ए-तारीकी-lonely feeling during darkness)
*****

01 August, 2017

• टिळक

     “..... आणि माझ्या बंधु-भगिनींनो, आज एक ऑगस्ट, टिळक पुण्यतिथी ....” वर्तमानपत्र वाचण्यास घेतले, आणि शालेय जीवनात केलेल्या भाषणांची तीव्रतेने आठवण झाली. टिळकांची करारी मुद्रा आजही सर्वांगावर रोमांच उभे करते. सत्याचीच कास सदैव धरावी असा संदेश देणारी ती भाषणे आजही कानाशी तशीच निनादतात. खुर्चीवर उभे राहून, हाताची घडी घालून, मोठ्या आवाजात बोलतानाची शालेय गणवेषातील स्वतःची बालमूर्ती आठवली, आणि ओठांवर आपसुकच स्मित आले. प्रत्येकाच्या भाषणाचा शेवट मात्र सारख्याच शब्दांनी होत असे ..... “आणि याबरोबरंच मी माझे भाषण संपवतो/संपवते, जय हिंद, जय भारत!”

     शालेय जीवनात हृदयी उमटलेला टिळकांचा ठसा आजवर पुसट देखील झाला नाही. आज पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची उजळणी करीत असता उचंबळून आले खरे, पण आजच्या पोकळीची जाणीव होऊन मन विषण्ण देखील झाले. भारतीय संस्कृतीची एक ओळख असलेली सहिष्णुता आज बळजबरीच्या सहनशीलतेची समानार्थी झाली आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात, मग ते शासकीय असो अथवा खाजगी, शैक्षणिक असो वा व्यावसायिक, कमालीची उदासीनता आहे. रहदारीचे नियम कसे पाळावेत ह्या ऐवजी आपण भावी पीढीला नियम न पाळल्याने होणार्‍या कारवाईत ‘मॅनेज’ कसे करावे ह्याचेच धडे अधिक देतो. पूर्वीची आडवळणे आज हमरस्ता होऊ बघताहेत. दररोज सीमोल्लंघन करणार्‍या भ्रष्टाचाराची सीमारेखाच अदृश्य झाली आहे. व्यंगचित्रे साधे स्मित देखील आणण्यात असमर्थ होण्याइतका तो सर्वदूर मुरलाय.

     कमालीची दूरदर्शिता दाखवून स्वातंत्र्यपूर्वकाळात उदात्त आणि राष्ट्रवादी हेतुने आरंभिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवास अशोभायमान स्वरूप बहाल करून आपण दशकांपासून करीत आलेल्या टिळकांच्या अपमानाची नोंद कुठल्या खात्यावर करावी? तीच गत शिवजयंतीची! शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा, आणि वाघनखांनी अफजलखानास यमसदनी धाडणारा तो शिवाजी; एवढीच काय ती शिवरायांची ओळख करवून घेतलेल्या अनुयायांना खरा शिवबा कधी गवसलाच नाही; आणि त्या दृष्टीने त्यांनी कधी प्रयत्नही केले नाहीत. विवेकपूर्ण शासन, शेती-संवर्धन, प्रभावी कर प्रणाली, अंतर्गत सुरक्षा, सर्वधर्मसमभाव, जातीय सलोखा, हे आणि अन्य अनेक गुंतागुंतीचे सामाजिक व राष्ट्रीय पैलू अगदी लीलया हाताळणार्‍या छत्रपतींची प्रतिमा तोरण, झेंडे आणि माल्यार्पणासारख्या शिष्टाचारांनी झाकाळून जाते. बहुतांश सार्वजनिक शिवजयंती समारोहांमध्ये समाज प्रबोधनाचा हेतू साकार झालेला तूर्तास तरी दिसत नाही. “मी शेंगा खाल्या नाही, मी मार खाणार नाही” असे निर्धाराने मास्तरांना सांगणारे टिळक अन्यायाविरुद्धचा ‘झीरो टॉलरन्स’ नकळत शिकवून गेले, पण आज झीरो टॉलरन्स देखील अंगावर बेतू लागला आहे. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा तडक प्रश्न इंग्रज सरकारला करून खटला ओढवून घेणार्‍या टिळकांच्या प्रेरणेने आज काही लोक तसलेच धाडस करू पाहतात; परंतु अशांवर आजही रोष ओढवून घेण्याचीच वेळ येते, याहून मोठे दुर्दैव ते कोणते?

     वर्तमानपत्राच्या अग्रलेखात टिळकांना मिळालेली ‘स्पेस’ संतोषजनक होती. मी न राहवून संपादकांना फोन करून आभार प्रकट केले. जागेअभावी लिहिता न आलेली आणखी काही माहिती संपादकांनी पुरविली. तत्कालीन काही सामाजिक तत्त्वांबाबत टिळकांची भूमिका प्रतिगामी असल्याची नोंद इतिहासात आढळते. इतर काही घटनांच्या वादाचा भोवरा देखील आढळतो. पण ह्या नोंदींच्या तुलनेत त्यांचा कार्यालेख व्यापक, विस्तृत आणि प्रगल्भ आहे. संपादकांशी चर्चा आटोपली, आणि ‘झालेत बहु, होतील बहु, .......’ या जुन्या वचनाची आठवण होऊन मी विचारमग्न झालो.

     आणखी किती काळ सत्ययुगाची प्रतीक्षा? टिळक, पुनर्जन्म जर वास्तविकता असती तर किती बरे झाले असते!

 टिळक स्मृतिदिन

*****