“..... आणि माझ्या बंधु-भगिनींनो, आज एक ऑगस्ट, टिळक पुण्यतिथी ....” वर्तमानपत्र वाचण्यास घेतले, आणि शालेय जीवनात केलेल्या भाषणांची तीव्रतेने आठवण झाली. टिळकांची करारी मुद्रा आजही सर्वांगावर रोमांच उभे करते. सत्याचीच कास सदैव धरावी असा संदेश देणारी ती भाषणे आजही कानाशी तशीच निनादतात. खुर्चीवर उभे राहून, हाताची घडी घालून, मोठ्या आवाजात बोलतानाची शालेय गणवेषातील स्वतःची बालमूर्ती आठवली, आणि ओठांवर आपसुकच स्मित आले. प्रत्येकाच्या भाषणाचा शेवट मात्र सारख्याच शब्दांनी होत असे ..... “आणि याबरोबरंच मी माझे भाषण संपवतो/संपवते, जय हिंद, जय भारत!”
शालेय जीवनात हृदयी उमटलेला टिळकांचा ठसा आजवर पुसट देखील झाला नाही. आज पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची उजळणी करीत असता उचंबळून आले खरे, पण आजच्या पोकळीची जाणीव होऊन मन विषण्ण देखील झाले. भारतीय संस्कृतीची एक ओळख असलेली सहिष्णुता आज बळजबरीच्या सहनशीलतेची समानार्थी झाली आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात, मग ते शासकीय असो अथवा खाजगी, शैक्षणिक असो वा व्यावसायिक, कमालीची उदासीनता आहे. रहदारीचे नियम कसे पाळावेत ह्या ऐवजी आपण भावी पीढीला नियम न पाळल्याने होणार्या कारवाईत ‘मॅनेज’ कसे करावे ह्याचेच धडे अधिक देतो. पूर्वीची आडवळणे आज हमरस्ता होऊ बघताहेत. दररोज सीमोल्लंघन करणार्या भ्रष्टाचाराची सीमारेखाच अदृश्य झाली आहे. व्यंगचित्रे साधे स्मित देखील आणण्यात असमर्थ होण्याइतका तो सर्वदूर मुरलाय.
कमालीची दूरदर्शिता दाखवून स्वातंत्र्यपूर्वकाळात उदात्त आणि राष्ट्रवादी हेतुने आरंभिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवास अशोभायमान स्वरूप बहाल करून आपण दशकांपासून करीत आलेल्या टिळकांच्या अपमानाची नोंद कुठल्या खात्यावर करावी? तीच गत शिवजयंतीची! शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा, आणि वाघनखांनी अफजलखानास यमसदनी धाडणारा तो शिवाजी; एवढीच काय ती शिवरायांची ओळख करवून घेतलेल्या अनुयायांना खरा शिवबा कधी गवसलाच नाही; आणि त्या दृष्टीने त्यांनी कधी प्रयत्नही केले नाहीत. विवेकपूर्ण शासन, शेती-संवर्धन, प्रभावी कर प्रणाली, अंतर्गत सुरक्षा, सर्वधर्मसमभाव, जातीय सलोखा, हे आणि अन्य अनेक गुंतागुंतीचे सामाजिक व राष्ट्रीय पैलू अगदी लीलया हाताळणार्या छत्रपतींची प्रतिमा तोरण, झेंडे आणि माल्यार्पणासारख्या शिष्टाचारांनी झाकाळून जाते. बहुतांश सार्वजनिक शिवजयंती समारोहांमध्ये समाज प्रबोधनाचा हेतू साकार झालेला तूर्तास तरी दिसत नाही. “मी शेंगा खाल्या नाही, मी मार खाणार नाही” असे निर्धाराने मास्तरांना सांगणारे टिळक अन्यायाविरुद्धचा ‘झीरो टॉलरन्स’ नकळत शिकवून गेले, पण आज झीरो टॉलरन्स देखील अंगावर बेतू लागला आहे. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा तडक प्रश्न इंग्रज सरकारला करून खटला ओढवून घेणार्या टिळकांच्या प्रेरणेने आज काही लोक तसलेच धाडस करू पाहतात; परंतु अशांवर आजही रोष ओढवून घेण्याचीच वेळ येते, याहून मोठे दुर्दैव ते कोणते?
वर्तमानपत्राच्या अग्रलेखात टिळकांना मिळालेली ‘स्पेस’ संतोषजनक होती. मी न राहवून संपादकांना फोन करून आभार प्रकट केले. जागेअभावी लिहिता न आलेली आणखी काही माहिती संपादकांनी पुरविली. तत्कालीन काही सामाजिक तत्त्वांबाबत टिळकांची भूमिका प्रतिगामी असल्याची नोंद इतिहासात आढळते. इतर काही घटनांच्या वादाचा भोवरा देखील आढळतो. पण त्यांच्या एकूण कार्यालेखात हे तपशील निव्वळ एका नोंदेइतपतच जागा व्यापू शकतील. संपादकांशी चर्चा आटोपली, आणि ‘झालेत बहु, होतील बहु, .......’ या जुन्या वचनाची आठवण होऊन मी विचारमग्न झालो.
आणखी किती काळ सत्ययुगाची प्रतीक्षा? टिळक, पुनर्जन्म जर वास्तविकता असती तर किती बरे झाले असते हो!
■ टिळक स्मृतिदिन
2 comments:
After reading the article felt like being back to school to learn lessons from History
Yes.
Golden days of school!
We need to learn true history, and not the fake one, which is being forced at every possible level and platform.
Post a Comment