16 October, 2016

'बिनतारी अहेर'

    “पोस्टमन .....!” अलीकडे क्वचितच कानी येणारी हाक ऐकून अगोदर काकूंनी दुर्लक्ष केले. एरवी तो अधून-मधून येणारी पत्रे दाराखालून सरकवून निघून जात असे. पण पुन्हा एकदा हाक ऐकू आली, तेव्हा काकू समोरच्या खोलीत आल्या. लोखंडी जाळीच्या भक्कम दारापलिकडे काकूंना कुणी उभे असलेले दिसले. चार-पाच ठराविक प्रश्न विचारून, तो नक्की पोस्टमनच आहे ह्याची खात्री करून घेऊ काकूंनी दार उघडले. गेल्या काही वर्षात भुरटे चोर आणि माथेफिरूंचा हैदोस वाढला होता. ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरून लूटमार करणे आणि जरासाही विरोध दर्शविल्यास जीवे मारण्याच्या घटना हल्ली नियमित झाल्या होत्या. त्यामुळे लोखंडी दार उघडण्यापूर्वीचे प्रश्न ही कवायतच झाली होती. “हं .... इथे ....” एका चुरगळलेल्या कागदावर वाचताना कुणालाही भोवळ यावी अशा गिचमिड अक्षरात लिहिलेल्या यादीतील एका नावापुढे पोस्टमनने काकूंना सही करावयास लावले. सुरेख, रंगीबेरंगी नक्षी असलेल्या चमचमणार्‍या कागदाचे वेष्टन चढवलेले ते एक पार्सल होते. पोस्टमन अजूनही रेंगाळतोय असे पाहून काकू म्हणाल्या, “थांबा, पाणी आणते.” उन्हात फिरून दमलेला पोस्टमन पंचाने घाम पुसत दाराशेजारी असलेल्या ओसरीवर एक लांब सुस्कारा सोडून बसला. “अकस्मात आलेल्या पाहुण्यास हातावर गोड घातल्याखेरीज परतू देऊ नये हों ....... वत्सलें .......” वेंगुर्ल्याच्या आत्याने अनेकदा सांगितलेले काकूंना पुन्हा एकदा आठवले, आणि वर्‍हाडात अपवादानेच कानी पडणारा तिचा सानुनासिक आवाज आठवून ओठांवर स्मित ही आले. पाण्याबरोबर अनपेक्षितपणे आलेली लाडवाची वाटी पाहून पोस्टमन ओशाळला. “त्रास घेतला तुम्ही .....” पोस्टमनने वाटी आणि गडवा-पेला घेत म्हटले. कामे बरीच शिल्लक असल्याने पोस्टमनने जरा लगबगीनेच लाडू खाल्ला आणि निरोप घेताघेता काकूंना विचारले, “इनाम देता?”
     साधारण वर्षभरापूर्वी काकांच्या खात्यात भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यापासून सर्व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे पेंशन बेमुदत काळापर्यंत रोखण्यात आले होती. काकांच्या माघारी मिळणारी अर्धे पेेेन्शन देखील तूर्तास बंद असल्यामुळे काकूंनी पोस्टमनला दहा दिवसानंतर येऊन बघण्यास सांगून वेळ निभावून नेली. काकांची साधी नोकरी आणि एकूण परिस्थिती बेताचीच. पण नामुश्कीचा असा क्षण बघणे काकूंना कधीच अपेक्षित नव्हते. मुलाला चांगले शिक्षण घेता यावे म्हणून सदैव काटकसरीचीच सवय, तरीदेखील किरकोळ पण आवश्यक खर्चाच्या वेळी मात्र कधीही हात आखडता घेतला नव्हता. मुलगा गुणी असल्यामुळे त्याच्या अवांतर खर्चाला देखील कधीही आळा घातला नाही. त्यामुळे पूर्ण स्कॉलरशीप मिळूनही त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरखर्च जपूनच करावा लागला. परदेशातील नोकरीवर शिक्कामोर्तब झाले त्या दिवशी त्याच्या आनंदाला पारावार नव्हता. काका-काकूंनाही त्याची तपश्चर्या फळास आलेली पाहून समाधान वाटले. अद्ययावत् सुखसोयींनी युक्त पश्चिमी देशाच्या सुबत्तेने त्याला अपेक्षेप्रमाणे भुरळ घातली. हळूहळू मायदेशाविषयीचा तिटकारा वाढू लागला. शहरात वाढलेल्या मुलाची ही स्थिति, तर तालुक्यात वाढलेल्या सुनेला तिकडल्या ऐश्वर्याने भुरळ घातली नसती तरच नवल होते. स्वतःच्याच मातीचा गंध दोघांनाही नकोसा होऊ लागला. सुरुवातीला वर्षातून दोन वेळा होणारी मायदेशाची वारी दोन वर्षात एकदा होऊ लागली. नियमितपणे येणारी पत्रे आधी वरचेवर आणि पश्चात् एखाद्या वेळीच येऊ लागली. लिहिणे कष्टाचे आणि फोन सोयीचा वाटू लागला. एरवी खंबीर वाटणारे काका-काकू मुलाच्या झपाट्याने बदललेल्या स्वभावामुळे खजिल झाले.
     विजेची आणि पाण्याची बिले भरण्याच्या रांगेत ताटकळत उभे राहणे, अर्धे पेन्शन लागू होईपर्यंत जवळजवळ वर्षभर काकांच्या कचेरीचे उंबरठे झिजवणे, चोरीच्या भीतीने दर खेपेला अगदी मोजकीच रक्कम काढण्यासाठी वारंवार बँकेच्या वार्‍या करणे, ह्या आणि काकांच्या माघारी ओघाओघाने आलेल्या अशा नाना जबाबदार्‍या पार पाडतापाडता काकूंना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू लागला. एकदा त्यांच्या आजारपणामुळे विजेचे बिल भरण्याची शेजारच्याला विनंती करण्याचे निमित्त झाले आणि उत्तर भारतातून उपजीविकेच्या शोधार्थ विदर्भात आलेला जगदीश घरचाच होऊन गेला. त्याचे मराठमोळ्या जेवणाचे वेड पाहून त्याची पत्नीदेखील काकूंकडून मराठी पाककलेचे धडे घेऊ लागली. एकदा जगदीशच्या सासूबाई सणासुदीला पाहुणी म्हणून आल्या असता, नातवाच्या पानात तुपातल्या पराठ्यांऐवजी साजूक तूप घातलेले साधे वरण चपाती बघून चाटच पडल्या. कोकणातून विदर्भात आलेल्या काकूंनाही वर्‍हाडी खाद्यपदार्थांची आवड अगदी नकळत आणि मोजक्याच कालावधीत जडली होती. बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा काकूंकडे दिवाळीस म्हणून त्यांची आत्या आली, तेव्हा गोळा-भाताचा बेत होता. कढवलेले तेल भातावर घालून आत्याने पहिला घास घेतला आणि चिंचेचे सार फुर्र करून पिताना ठसकाच लागला. “अगदी थेट वर्‍हाडी झालीस गों .... वत्सलें .....” आत्याने ठसक्यातून सावरून म्हटले आणि खो खो करीत पुन्हा ठसका लागेपर्यंत मनमुराद हसली.
     दिवाणावर पडल्यापडल्या विचारात हरवून केव्हा डोळा लागला ते काकूंना कळलेच नाही. काळोख पडायला जरासाच अवकाश होता. रोजच्या नेमानुसार काकूंनी तुळशीशेजारी दिवा ठेवला आणि अंगणात राहून गेलेली जगदीशच्या मुलाची लहानशी तीन चाकी सायकल घरात घेतली. त्याची अर्धी खेळणी काकूंकडेच मुक्कामास असायची. अधूनमधून त्या मायलेकांचा देखील मुक्काम पडायचा. जगदीश कोर्ट-कचेरीच्या कामाने त्याच्या गावी एकटाच जात असे. सुव्यवस्थेचे तिथे धिंडवडे निघाल्याचे तो सांगत असे. त्याच्या पत्नीने लग्नाच्या वेळी त्याचे घर आणि गाव पाहिले तेवढेच. मुलाला त्याने गावी अजून नेलेच नव्हते. पण दर खेपेस परतला की त्याच्या मूळ स्थानाविषयी भरभरून बोलायचा. मातीशी नाते तुटल्याचे दुःख त्यास बोचत असे; पण परतण्यासारखी स्थिती तिथे उरली नव्हती. ज्यांना शक्य होते त्यांची बिर्‍हाडे स्थलांतरीत झालेली आणि उरलेली नाइलाजास्तव टिकलेली. अवघ्या गडावर सत्ता चोर-लुटारू आणि नराधमांची. “केव्हा संपणार रे बाबा हे सर्व ... पुरुषोत्तमा ....” रात्रीचे जेवण उरकून ओटा-गॅस पुसतापुसता काकू पुटपुटल्या. निजायला अवकाश असल्यामुळे पुन्हा समोरच्या खोलीत आल्या. बराच वेळ विचार केल्यानंतर, मनातली सगळी खिन्नता बाजूला सारून आणि निराशा झटकून काकूंनी पार्सल उघडले. दिवाळीचा अहेर म्हणून मुलाने कॉर्डलेस फोन पाठवला होता. चमकदार कागदात गुंडाळलेले मातृप्रेमाचे पोस्त! गत अनेक वर्षांत मनाच्या तारा एकेक करीत तुटत गेल्या होत्या. नकळतच, पण किती समर्पक अहेर मिळाला होता; बिन‘तारी’ बोलू शकणार्‍या गोजिरवाण्या खेळण्याचा!
*****

No comments: