माझ्या लहानपणी आई घराच्या अंगणातच
भाजीपाल्याची लागवड करायची. बऱ्याचदा भाजी तोडून आणण्याचे काम ती माझ्यावर सोपवीत असे.
मी देखील आनंदाने मातीत खेळण्याची ती संधी घालवीत नसे. “कोवळी-कोवळी पाने खुडायची,
बरं का ....” माझ्या हाती टोपली देत आई सांगत असे. कोरड्या लाल मिरच्या घालून केलेल्या
चवळीच्या खरपूस भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. तव्यावरून नुकत्याच काढलेल्या चपातीबरोबर
ती खाण्याच्या स्वर्गीय सुखात, भाजी खुडताना झालेल्या बोटांच्या करड्या टोकांचा लगेच
विसर पडायचा. एकेक वर्ग पुढे जात विज्ञान शिकत गेलो, तसे-तसे सृष्टीचे रहस्य उमगू
लागले. मनुष्य आणि प्राण्यांमध्ये असते तसलेच काहीसे जाळे वृक्षवल्लींच्या अंतरंगात
असते, आणि त्यावाटे विविध द्रव्यांच्या सहाय्याने पोषक तत्त्वांचे वहन होऊन पाने, फुले,
फळे बहरतात हे जाणून सुखद विस्मय झाला. माझ्या
एका शालेय पाठ्यपुस्तकात जगदीशचंद्र बोसांवर आधारीत धडा होता. वृक्षवल्लींनाही भावना
असतात आणि यातना होतात हे विविध यंत्रांच्या सहाय्याने बर्याच वर्षांपूर्वी त्यांनी
सिद्ध करून दाखविले होते. जगभर मान्यता प्राप्त झालेले ते संशोधन वाचले आणि भाजी खुडताना
झालेल्या बोटांच्या करड्या टोकांचे कोडेही उलगडले. “अंधार पडल्यानंतर पाना-फुलांना
हात लावून त्रास देऊ नये, निजलेली असतात ती” लहानपणी खोटे-खोटे वाटणारे हे आजीचे शब्द
खरे वाटू लागले. त्यापुढील वर्गांमध्ये मानवी कान व डोळे एका विशिष्ट वेवलेंग्थ च्या
अलीकडे आणि पलीकडे ऐकू व बघू शकत नाही हे गुपितही कळले. भाजीची पाने खुडणे असो अथवा
कीट-नाशकांच्या मदतीने किड्या-मुंग्यांचा जाच कमी करणे; केवळ जे लाल वाहील तेच रक्त
आणि ऐकू येते तीच किंकाळी ह्या संकल्पना मोडीत निघाल्या. निव्वळ प्राणीहत्या म्हणजेच
जीवहत्या आणि पाप ह्या व्याख्या अपुर्या वाटू लागल्या.
वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार
केल्यास, वास्तविक कुठल्याही सजीवाला स्वतःच्या अस्तित्वासाठी सजीव वस्तूंवरच अवलंबून
राहवे लागते. सजीव वस्तूंची भविष्यातील दुर्मिळता हेरून, बुद्धीच्या जोरावर आणि विज्ञानाचा
सदुपयोग करून मानवाने सजीवाला निर्जीव पर्याय देखील शोधले. पण खाद्यसामुग्री, वस्त्रे,
पादत्राणे, इतर दैनंदीन गरजेच्या वस्तू, इतकेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात देखील काही
वनस्पतीजन्य वस्तूंना आजवर पर्याय लाभलेच नाहीत. काहींना आहेत परंतु गैरसोयीचे अथवा
अपुरे. हेच विधान प्राण्यांपासून निर्मित वस्तूंसाठी देखील लागू पडते. मुद्दा पाप-पुण्याचा
नसून मानवी अस्तित्वासाठीच्या सोयींचा, प्रगतीकरिता असलेल्या संघर्षाचा आणि मानवाच्या
जाणीवेच्या अपुर्या क्षमतेचा आहे. सृष्टीवर विजय मिळवून मानवाने स्वतःचे अस्तित्व
टिकविले. प्रगतीच्या त्याच्या संघर्षात सजीवाची आहुती अपरिहार्यच ठरली. सृष्टीच्या
प्रत्येक घटकाच्या अतुलनीयतेची कधी जाणीवच नव्हती असे नव्हे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’
सारख्या रचना वाचून-ऐकूनच मानव लहानाचा मोठा झाला. पण जीवनाच्या रणधुमाळीत ह्या शब्दांचे
सार ग्रहण करावयाचे राहून गेले. ‘वदनी कवळ घेता’ सारखी सुवचने वदूनच एके काळी आपल्याकडे
प्रत्येक भोजनाची सुरुवात होत असे. अन्नाचा एकही कण वाया जाऊ न देता पान स्वच्छ करून
श्लोक आचरणात आणावा लागत असे. अन्नाची महती सांगणारे ह्यासारखे श्लोक काळाच्या ओघात
मोजक्याच प्रसंगी म्हणू जाऊ लागले आणि अन्नाच्या पूर्णब्रह्मत्वाची उजळणी न झाल्याने
‘लेफ्ट ओव्हर’ चे ढिगारे उंची गाठू लागले. एका ठराविक वेवलेंग्थच्या घेर्यातच
ऐकू व बघू शकणार्या मानवाने प्राणीहत्येलाच अधिक संवेदनशील मानले. एक्सप्रेस हाय-वे
सारख्या अत्याधुनिक सोयींसाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड असो अथवा लहान
रेस्टॉरंट ते धनदांडग्यांच्या ‘बिग फॅट वेडिंग’ मध्ये होणारी अन्नाची नासाडी; दोन्ही
बाबी प्राणीहत्येइतक्याच क्लेशदायक व संवेदनशील, पण जीवहत्येच्या रूढ व्याख्येत स्थान
न मिळालेल्या. दृष्टीआड सृष्टी असते. दैनंदीन वापरातल्या वस्तूंच्या निर्मितीत किती
आणि कुठल्या सजीवांचे बळी गेले, ह्याची जराही जाणीव न ठेवता आपण त्यांचा वापर तर करीतच राहतो.
वैद्यकीय अभ्यासक्रमात मानवी शरीराची
अतिशय सुरेख, नीटनेटकी आणि प्रतिकृती निर्माण करण्यास अशक्य असलेली अद्भुत रचना शिकून सृष्टी किती अफाट आणि अगम्य आहे याची प्रचीति आली. मानवाच्या असंख्य भावना, जाणीवा
व त्याच्या असामान्य कल्पनाशक्तीशीही परिचय झाला. परंतु त्याचबरोबर त्याच्या
कमतरताही उमजल्या आणि मानव त्याच्या मेंदूचा काही भाग उपयोगात आणतच नसल्याचेही कळले.
असेच एका तासाला अल्ट्रासाऊंड, एक्स-रे, इन्फ्रारेड लहरींसोबत इतर तरंगांबद्दलही माहिती
मिळाली. “........ बिकॉज दीज आर बियाँड युअर ऑडिबल अँड व्हिजिबल स्पेक्ट्रम.” खणखणीत
स्वरात सरांनी सांगीतले आणि स्पेक्ट्रमच्या मर्यादेतच ऐकू-बघू शकणार्या मानवाच्या
संवेदनशीलतेचे व जाणीवेच्या कुवतीचे भौतिक अपुरेपण प्रकर्षाने जाणवले. ह्यातले भौतिकशास्त्र
क्षणभर बाजूला सारून वेगळ्या अनुषंगाने विचार केला असता वाटते कि खरच, व्यक्तिगत जीवनातदेखील
एका विशिष्ट स्पेक्ट्रम च्या अलीकडे व पलीकडे, आपल्याला ऐकू येत नाही, दिसत नाही,
आणि जाणवत तर अजिबात नाही!
*****
No comments:
Post a Comment