11 October, 2016

'पुस्तकातला ऑटम'

     “आऽऽऽच्छी ....!” माझा मित्र फोनवर बोलता बोलता शिंकला, आणि ‘तिकडल्या’ हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे सांगितले. परदेश-वारी प्रत्यक्ष करण्याचा योग आला नसला, तरीही चित्रपट, वर्तमानपत्र, कथा-कादंबर्‍या आणि हल्लीच्या फेसबुक-व्हॉट्सॲप आंदोलनामुळे पाश्चात्त्य देशांचे एक विशिष्ट चित्र मनावर आपोआप रेखाटले गेले आहे. स्वच्छ, सुंदर, सुबक, मोहक, देखणे, मनोरम अशी अनेक विशेषणे लावता येतील असे एकाहून एक सरस देश. शाळेत असताना पाश्चात्त्य लेखक आणि कवींनी बालमनात जे चित्र भरले, ते फोटोंच्या माध्यमातून खरेच वाटू लागले. “विस्तीर्ण बाग, बागेतले मऊसर हिरवेगार लॉन, सर्वदूर पसरलेली रंगीबेरंगी पानगळ, एका पार्क-बेंचवर रेलून बसलेला, मानेपर्यंत रुळलेल्या केसांशी उगीच चाळा करणारा रांगडा तरूण, पलीकडच्या कोपर्‍यात असलेल्या बेंचवर वॉकिंग-स्टिकच्या मुठीवर स्वतःची मूठ आणि हनुवटी टेकवून शून्यात बघणारा साठीतला एकटा, दगडी पायवाटेवर विखुरलेली कोरडी पाने आपल्या गुडघ्यापर्यंतच्या गमबुटांनी निर्दयतेने चुरगाळून पुढेच पुढे जाणारी देखणी, आणि त्या पानांच्या करकरण्याने कान टवकारून लडिवाळपणे भू करणारा रुबाबदार जर्मन शेपर्ड, असे सगळे बघण्यात काय मजा येत असेल रे” ह्या माझ्या भाबड्या बोलण्यावर तो म्हणाला, “अरे कोणता पार्क आणि कसले गवंत?” त्याच्या मते पार्क-बेंचवर बसू देण्याइतकी तिकडली थंडी काही रमणीय वगैरे नसते. शेक्सपिअर ते टॉलस्टॉय आणि वर्डस्वर्थ ते फ्रॉस्ट पर्यंत सगळ्यांना माझ्या मित्राने एका झटक्यात खोटारडे ठरवून टाकले होते. नवल म्हणजे ह्याच मित्राला भारतातला ग्रीष्माअंती येणारा पहिला पाऊस मात्र केवढा आवडायचा; नव्हे, अजूनही आवडतो. आता मी त्यास माझी पावसातली त्रेधा तपशीलवार सांगीतली, तर पाडगावकर-माडगूळकर मंडळी त्याला खोटी वाटावयास लागतील.
     कामाच्या व्यापात, जबाबदार्‍यांच्या गराड्यात बहुधा त्या थंडीचा त्रास त्याला प्रकर्षाने जाणवत असावा. दुरून डोंगर साजरे असतात. न राहवून मला शालेय जीवनात वाचलेली ‘दि लिटिल मॅच गर्ल’ आठवली. आगपेटीतल्या प्रत्येक पेटत्या काडीच्या प्रकाशात दर वेळी सुरेख स्वप्नात हरविणारी चिमुरडी, शेवटची काडी विझताच जीवघेण्या थंडीत जीव टाकते. प्रेमात पडण्याच्या नाजुक वयात ती शोकांतिका वाचून सर्वांगावर आलेले शहारे आजही स्मरतात. प्रमाणाबाहेरची बर्फवृष्टी, निसरडे रस्ते, त्यामुळे होणारे अपघात, फ्लू ची भयंकर साथ, अंगभर घालाव्या लागणार्‍या जाड्याभरड्या कपड्यांमुळे होणारी अस्वस्थता ह्या सर्वांची झळ जावे त्यांच्या देशा तेव्हाच कळे. जी अवस्था माझी, तीच त्याची. त्याला इकडच्या ऋतूंचे अतोनात वेड. परंतु भारतातदेखील विविध ऋतूंमध्ये नाना कारणांनी त्रास होतोच. गेली कित्येक वर्षे तिकडे वास्तव्यास असल्यामुळे इकडल्या त्रासाची बहुधा त्यास जाणीव नसावी.
          पण हा ऋतूंमधील त्रास नाण्याची एकच बाजू सांगतात. ही बाजू जेवढी जाचक वाटते, तेवढीच दुसरी बाजू रमणीय आणि आल्हाददायक असते. जीवघेण्या थंडीत कामे उरकून जेव्हा मित्र घरी परतत असेल, तेव्हा फायरप्लेससमोर पाय मोकळे सोडून, वाफाळलेल्या, फेसाळलेल्या गरम कॉफीचे घोट घेताना जे समाधान तो अनुभवत असेल, तसलेच काहीसे आपणही पावसात चिंब भिजून, घरी परतून, कढत पाण्याचे स्नान उरकून, आल्याचा चहा पिताना अनुभवतो. कॉफीचा आस्वाद घेता घेता खिडकीबाहेरच्या पार्कचा मघाचा शुष्क देखावा त्यालाही तेवढाच रम्य वाटत असेल, जेवढा खिडकीबाहेरचा धो-धो पाऊस आपल्याला सुखावतो. बोचणारी बाजू पाहिल्याखेरीज मखमली बाजूचे महत्त्व आणि अस्तित्व पटत नसावे. नाण्याच्या ह्या सुखद बाजूचे बरेचसे श्रेय लेखणीबहाद्दरांनाच द्यावे लागेल. आपल्या नकळत आपण बालपणी आणि ऐन तारुण्यात वाचलेले शब्द प्रत्यक्षात जगत असतो. त्या शब्दांत स्वतःला ठेवून एका रम्य विश्वात रमत जातो.
     सांसारिक आणि व्यावहारिक गुंतागुंतीत अडकून बर्‍याचदा आपण ऋतूंमध्ये गंमत देखील असते, हे मुळी विसरूनच जातो. अशा वेळी पूर्वी वाचलेले साहित्य आठवून जखमांवर फुंकर घातल्यागत वाटते. ऋतू असोत अथवा जीवनातील विभिन्न अवस्था, प्रत्येक परिस्थितीत लेखक वा कवी स्वतःला तर चपखलपणे बसविण्यात तरबेज असतातच; पण वाचकाला देखील एका वेगळ्याच, काल्पनिक पण वास्तव वाटणार्‍या अवस्थेत सहज घेऊन जातात. त्यांच्या ओळी कल्पनाविलास, अतिशयोक्ति देखील असतील; पण रोजच्या रहाटगाडग्यातून काही काळ बाहेर निघून, मोजके क्षण स्वप्नात हरवू देऊन, पुन्हा त्याच किंवा त्याहूनही अधिक कष्टांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मात्र नक्कीच देतात. किंबहुना त्यांचे शब्द वास्तव धरले तर अगदी काही क्षणांपूर्वीपर्यंत नकोसे वाटणारे पावसातले डबके, छपक-छपक करण्याची लालूच दाखविल्याखेरीज राहत नाही.
*****

No comments: